For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नंदगडला अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

08:26 AM Oct 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
नंदगडला अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
Advertisement

आमदारांच्या उपस्थितीत ग्रा. पं. मध्ये तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक : लक्ष्मी यात्रेसंदर्भात प्रमुख समस्यांवर चर्चा

Advertisement

वार्ताहर/नंदगड

नंदगड गावासाठी सांडपाणी निचऱ्याचा प्रश्न केंद्र सरकारच्या निधीमुळे मार्गी लागला आहे. परंतु अद्याप गावातील काही रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. आवश्यक ठिकाणी अतिरिक्त पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेलची आवश्यकता आहे. उच्च दाबाचे ट्रान्स्फॉर्मर, विद्युत दिवे व अन्य विविध विकासकामांसाठी निधीची आवश्यकता आहे. जत्रा अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यात्रेपूर्वी विकासकामे पूर्ण होणे गरजेचे आहे. यात्रेसाठी विशेष निधी मिळवण्यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना भेटण्याचा निर्णय ग्राम पंचायत सदस्यांनी घेतला. नंदगड ग्रा. पं. कार्यालयात आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी ग्रा. पं.अध्यक्ष यल्लाप्पा गुरव होते.

Advertisement

नऊ कि.मी. अंतरावरून कुणकीकोप येथून जलवाहिनीद्वारे नंदगडला पणीपुरवठा केला जातो. उन्हाळ्dयात पाणी समस्या उद्भवते. अशावेळी जनतेला पाणीपुरवठा करताना ग्रा.प.समोर अनेक समस्या निर्माण होतात. त्यासाठी बोअरवेल खोदाव्यात, अशी सूचना  यल्लाप्पा गुरव यांनी मांडली. माजी उपाध्यक्ष मन्सूर तहसीलदार यांनी हा प्रश्न उचलून धरला. गावच्या पश्चिमेला केबिन तळे आहे. तळ्याच्या पाण्याचा उपयोग गावातील जनता करते. तळ्याच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी सदस्य प्रदीप पवार यांनी केली. यात्रेकरूंसाठी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केली जावी, अशी सूचना सदस्य नागो पाटील यांनी केली.

ट्रान्स्फॉर्मर व विद्युत फ्युज कमी उंचीवर बसविले आहेत. ट्रान्स्फॉर्मर व विद्युत फ्युज उंचीवर बसवाव्यात, अशी मागणी प्रमोद पाटील यांनी केली. गदगा परिसरात पेवर्स बसवावेत, अशीही सूचना मांडली. पोलीस निरीक्षक एस. सी. पाटील यांनी यात्रेदरम्यान प्रकाशाची उत्तम व्यवस्था राहिली तर यात्रेकरूना सुलभ होईल. त्यासाठी आवश्यक विद्युत दिव्यांची सोय करावी, अशी सूचना मांडली. हेस्कॉम व पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना लागलीच कामाला लागण्याची सूचना आमदार हलगेकर यांनी केली. खानापूर-लिंगनमठ राज्यमार्गाच्या विकासासाठी यापूर्वीच दहा कोटी रुपये मंजूर झाले असून हा रस्ता नंदगडला जोडणारा असून येत्या दीड-दोन महिन्यात रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करावे, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना आमदारांनी केली. यात्राकाळात येणाऱ्या भाविकांसाठी भात कापणीनंतर पार्पिंगसाठी जागा निश्चित करण्यात येईल, असे यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुभाष पाटील यांनी सांगितले. यात्रा सुरळीत पार पडावी म्हणून नऊ कमिट्या केल्याची माहिती शंकर सोनोळी यांनी दिली.

बाजारपेठेतील अतिक्रमण लवकरच हटवणार

नंदगड बाजारपेठेत दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. अनेकजण रस्त्यावरच आपल्या दुकानातील माल ठेवत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्यांची गोची होत आहे. याचा सारासार विचार करून यापूर्वीच ग्रामपंचायतकडे गावातील जनतेनी बाजारपेठेतील अतिक्रमण हटवण्यासाठी मागणी केली होती. त्यानुसार आतापर्यंत अतिक्रमण केलेल्या दुकानदारांना दोनवेळा नोटीस दिली आहे. शेवटची नोटीस एक-दोन दिवसात देण्यात येणार आहे. या नोटिसाला कुणी दाद न दिल्यास जेसीबीद्वारे अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याचे पिडीओनी सांगितले.

Advertisement
Tags :

.