वायनाडला जागतिक पर्यटन केंद्र करू : राहुल गांधी
प्रियांका वड्रांसोबत केला रोड शो
वृत्तसंस्था/ वायनाड
केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघात 13 नोव्हेंबरला पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी प्रचाराची सांगता झाली आहे. या प्रचाराच्या अखेरच्यादिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रियांका वड्रा यांच्यासोबत प्रचार केला आहे. यादरम्यान त्यांनी वायनाडला जगातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळख मिळवून देऊ असे आश्वासन दिले आहे.
काँग्रेस महासचिव प्रियांका वड्रा या पोटनिवडणुकीत युडीएफच्या उमेदवार आहेत. राहुल गांधी प्रियांका यांच्यासोबत सुल्तान बाथरीमध्ये रोड शो केला आहे. त्यानंतर सभेला संबोधित करताना आव्हान म्हणून वायनाडला जगातील सर्वात चांगले पर्यटनस्थळ म्हणून ओळख मिळवून देण्यास प्रियांका वड्रांना मदत करणार असल्याचे म्हटले आहे. या रोड शोदरम्यान राहुल गांधी हे आय लव्ह वायनाड असा मजकूर असलेला टीशर्ट परिधान करून असल्याचे दिसून आले.
राजकारणात प्रेमाला स्थान
राजकारणात प्रेम या शब्दाला मोठे स्थान असल्याचे वायनाडच्या लोकांनी मला शिकविले आहे. मी अनेक वर्षांपासून राजकारणात या शब्दाचा वापर केला नव्हता. परंतु वायनाडमध्ये आल्यावर येथील लोकांनी या शब्दाला राजकारणात मोठे स्थान असल्याचे शिकविले. द्वेष आणि संतापाशी लढण्यासाठी प्रेम आणि स्नेह हेच अस्त्र असल्याचा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे.
मतदारसंघात पोटनिवडणूक
वायनाड या मतदारसंघात राहुल गांधी यांनी राजीनामा द्यावा लागल्याने पोटनिवडणूक होत आहे. राहुल गांधी हे लोकसभा निवडणुकीत रायबरेली आणि वायनाड या दोन्ही मतदारसंघातून निवडून आले होते. परंतु त्यांनी रायबरेली हा मतदारसंघ कायम ठेवत वायनाडचे सदस्यत्व त्यागले होते. या मतदारसंघात काँग्रेसने प्रियांका वड्रा यांना उमेदवारी दिली आहे. तर त्यांच्यासमोर डाव्या पक्षांच आणि भाजपचे आव्हान आहे.