चीनसंबंधी सरदार पटेलांचे धोरण अंमलात आणू : जयशंकर
पाकिस्तानशी त्याच्या अटींनुसार चर्चा नाही : विदेशमंत्र्यांचा कठोर संदेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंडित जवाहरलाल नेहरूंचे चीनसंबंधीचे धोरण समजून घेणे अवघड आहे, पंचशील करार याचेच उदाहरण आहे. चीनसोबतचे संबंध वस्तुस्थितीच्या आधारावर असायला हवेत. पंडित नेहरू यांनी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व भारताऐवजी चीनला प्रदान करावे अशी केलेली सूचना विचित्र होती. आमचे पूर्वीचे चीन धोरण आदर्शवादावर आधारित होते आणि वस्तुस्थितीच्या उलट होते. चीनसोबतचे आमचे संबंध वास्तवावर आधारित असायला हवेत. सरदार पटेल देखील याच मताचे होते. तर पंतप्रधान मोदी हे चीनसंबंधी व्यवहारिक दृष्टीकोन बाळगत असल्याचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.
दहशतवादामागे पाकिस्तानचा हात आहे. सीमपेलिकडून दहशतवाद फैलावून पाकिस्तान भारतावर चर्चेसाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आम्ही पाकिस्तानश चर्चा त्याच्या अटींच्या आधारावर करणार नसल्याचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे. याचबरोबर त्यांनी कॅनडात खलिस्तानी शक्ती मजबूत होत असून हा प्रकार भारत तसेच कॅनडाच्या हिताचा नसल्याचे सुनावले आहे.
पाकिस्तान दीर्घकाळापासून सीमेपलिकडून दहशतवाद फैलावत भारतावर चर्चेसाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु पाकिस्तानने ठेवलेल्या अटींनुसार आम्ही त्याच्याशी चर्चा करणार नसल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे.
जवाहरलाल नेहरू यांनी चीन प्रथम या धोरणावर काम केले होते. प्रारंभापासूनच नेहरू आणि सरदार पटेल यांच्यादरम्यान चीनकशाप्रकारे प्रत्युत्तर द्यावे या मुद्द्यावर मतभेद राहिले होते. मोदी सरकार चीनचा सामना करण्यासाठी सरदार पटेल यांच्या धोरणानुसार काम करत आहे. परस्पर संबंधांवर आधारित संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
कॅनडात खलिस्तानी शक्ती
कॅनडाच्या राजकारणात खलिस्तानी शक्तींना अत्यंत मोठे स्थान देण्यात आले आहे. तसेच या खलिस्तानी शक्तींना द्विपक्षीय संबंधांना नुकसान पोहोचू शकेल अशाप्रकारच्या कारवाया करण्याची सूट देण्यात आली आहे. हा प्रकार भारत तसेच कॅनडाच्या हिताचा नसल्याचे माझे मानणे असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
मोदींच्या दौऱ्यासाठी प्रत्येक देश इच्छुक
भारत स्वत:चे विचार कुणावरच लादत नाही. आम्हाला अधिक प्रासंगिकतेने पाहिले जाते. अनेक परिणामांना प्रभावित करण्याची क्षमता बाळगून असणारा देश म्हणून आम्हाला ओळखले जाते. अनेक जागतिक नेते भारतात येण्याची इच्छा बाळगून आहेत. एक विदेश मंत्री म्हणून माझ्यासमोरील मोठ्या आव्हानांमध्ये पंतप्रधान दरवर्षी प्रत्येक देशाचा दौरा करू शकत नाही हा मुद्दा सामील आहे. तर प्रत्येक देश मोदींच्या दौऱ्यासाठी इच्छुक असल्याचे जयशंकर म्हणाले.
भारत शब्द
भारत या शब्दाबद्दल सध्या सक्रीय चर्चा सुरू आहे. अनेकार्थाने लोक या चर्चेचा वापर स्वत:च्या संकीर्ण उद्देशांसाठी करतात. भारत हा शब्द केवळ एक संस्कृतीला उद्देशित नाही, तर हा आत्मविश्वास आहे, ओळख आहे. हा काही संकीर्ण राजकीय चर्चा किंवा ऐतिहासिक-सांस्कृतिक चर्चा नाही, ही एक मानसिकता आहे. आम्ही खरोखरच पुढील 25 वर्षांमध्ये ‘अमृतकाळा’साठी गांभीर्याने तयारी करत असू आणि ‘विकसित भारत’विषयी बोलत असू तर तुम्ही ‘आत्मनिर्भर भारत‘ झाला तरच हे शक्य असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.
व्हाय भारत मॅटर्स पुस्तक
विदेशमंत्री जयशंकर यांचे ‘व्हाय इंडिया मॅटर्स’ हे पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे. स्वत:मधील राजनयिकाकडे स्वत:च्या क्षेत्राचे ज्ञान आणि अनुभव किती आहे हे त्यांनी या पुस्तकात मांडले आहे.