ताकद असेतोपर्यंत सीमालढा लढावा लागेल
संमेलनाध्यक्ष मधुकर भावे यांचे प्रतिपादन : प्रगतिशील लेखक संघाचे संमेलन उत्साहात
बेळगाव : मराठी भाषा, संस्कृती, अस्मिता टिकविण्यासाठी तेथील खेडे घटक, भौगोलिक परिस्थिती व लोकेच्छा महत्त्वाची आहे. 70 वर्षांपासून सुरू असलेल्या या लढ्याला अद्याप न्याय मिळाला नाही, ही दुर्दैवी बाब आहे. ताकद असेतोपर्यंत हा लढा लढावा लागेल, असे विचार मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी व्यक्त केले. प्रगतिशील लेखक संघ बेळगावतर्फे आयोजित तिसऱ्या मराठी साहित्य संमेलनात ते बोलत होते. रेल्वे ब्रिज येथील संत तुकाराम महाराज सभागृहात हे संमेलन पार पडले. व्यासपीठावर पुणे येथील अन्नपूर्णा परिवारच्या अध्यक्षा डॉ. मेधा सामंत-पुरव, कॉ. डॉ. भालचंद्र कांगो, कॉ. नागेश सातेरी, प्रा. आनंद मेणसे, कॉ. कृष्णा शहापूरकर, समिती नेते प्रकाश मरगाळे आदी उपस्थित होते. ते म्हणाले, सीमाभागात मराठी जनतेचे मराठीवर प्रेम आहे. 2004 साली सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेला पण महाराष्ट्राने म्हणावा तसा पाठपुरावा केला नाही, याची खंत वाटते. बेळगावच्या अस्मितेच्या सीमाप्रश्नी केंद्र सरकारवर दबाव घालणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
समाजात दैववाद पसरत आहे : कॉ. डॉ.भालचंद्र कांगो
समाजात दैववाद पसरत चालला आहे. परिस्थती बदलत चालल्याने मानवी मनही बदलत चालले आहे, असे विचार कॉ. डॉ. भालचंद्र कांगो यांनी संमेलनातील दुसऱ्या सत्रात ‘आचार्य अत्रे आज हवे होते’ या विषयावर बोलताना व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, इतिहासाची मोडतोड करून हवा तसा इतिहास समोर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे समाजात भ्रम निर्माण करण्याचे काम काहींनी केले आहे. भारतीय घटनेची वैशिष्ट्यो महत्त्वाची असून आजच्या पिढीत ती हरवत चालली आहेत का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
काळजाचा ठाव घेणाऱ्या कविता
जयसिंगपूर येथील प्रा. डॉ. सुनंदा शेळके यांच्या अध्यक्षतेखाली चौथ्या सत्रात कवी संमेलन रंगले. प्रा. सुनंदा शेळके, मेधा भंडारे, चंद्रशेखर गायकवाड, भरत गावडे, रोशनी हुंदरे, सागर मरगाण्णाचे, प्रा. मनीषा नाडगौडा, गजानन सावंत यांनी कविता सादर करून रसिकांना विचार करायला भाग पाडले.
निर्भयता समजून घ्या
व्यवस्थेला प्रश्न विचारला किंवा निर्भयता दाखविली तर समाजात भयाचे वातावरण निर्माण होत आहे. भीतीच्या सामोरे स्वत:हून जाण्याचा निर्णय म्हणजे निर्भयता होय. त्यामुळे निर्भयता समजून घेणे गरजेचे आहे, असे मत संमेलनातील पाचव्या सत्रात सातारा येथील महाराष्ट्र अंनिसचे अध्यक्ष डॉ. हमीद दाभोळकर यांनी ‘निर्भय जीवन कसे जगावे’ या विषयावर बोलताना व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते आचार्य अत्रे प्रतिमेचे व साहित्याचे पूजन करण्यात आले. मुन्शी प्रेमचंद प्रतिमेचे पूजन करून संमेलनाचे उद्घाटन झाले. स्वागत व प्रास्ताविक प्रा. आनंद मेणसे यांनी केले. यावेळी मान्यवरांचा घोंगडी, पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी कृष्णा शहापूरकर यांनी लिहिलेल्या ‘संयुक्त महाराष्ट्र आणि सीमाप्रश्न’ व डॉ. सुनंदा शेळके यांनी लिहिलेल्या ‘प्रतिभेच्या पारंब्या’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले. उद्घाटक डॉ. मेधा सामंत-पुरव यांनी मनोगतात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बेळगावचा भाग बाजूला राहिल्याची खंत व्यक्त केली. त्याबरोबरच अन्नपूर्णा महिला मंडळाचा ‘स्वातंत्र्यसेनानी भारतरत्न कॉ. अरुणा असफअली पुरस्कार’ डॉ. भालचंद्र कांगो यांना प्रदान करण्यात आला. 10,000 रुपये, प्रमाणपत्र, घोंगडी आणि ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरुप होते.
आपली संस्कृती जगात श्रेष्ठ
जाती, धर्माच्या समुहामध्ये निष्ठा महत्त्वाची आहे. आपली संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. ही संस्कृती जोपासताना तिला चालना देणेही गरजेचे आहे. मात्र, सध्या नेत्यांकडून हुकूमशाहीकडेच वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे, असे विचार संमेलनातील तिसऱ्या सत्रात शिवाजी विद्यापीठाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी व्यक्त केले.