भारताला हवे असल्यांचे प्रत्यार्पण करु !
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानातील ज्या लोकांपासून भारताला चिंता वाटते त्यांना भारताकडे सोपविण्याची आमची तयारी आहे, असे विधान पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री बिलावल भुत्तो यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण, काही दिवसांपूर्वीच भारताशी युद्ध करण्याची आणि भारताचे रक्त सांडण्याची भाषा भुत्तो यांनी केली होती. मात्र, आता त्यांनी अचानक सौम्य आणि सहकार्याची भाषा केल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.
पाकिस्तानला भारताशी संबंध सुधारयचे आहेत. त्यासाठी विश्वासदर्शक वातावरण निर्माण होण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तान यासाठी पावले उचलायला तयार आहे. भारताला पाकिस्तानातील काही लोकांच्यासंबंधी चिंता आहेत. हे लोक भारताची हानी करीत आहेत, अशी त्याची भावना आहे. त्यामुळे अशा लोकांना आम्ही भारताचे समाधान करण्यासाठी भारताच्या आधीन करण्यास तयार आहोत. भारताने आमच्याशी चर्चा करावी, असा त्यांचा प्रस्ताव आहे.