भोमवासीयांचा प्रश्न नक्की सोडवू : कामत
पणजी : केंद्रीय वाहतूक मंत्रालयातर्फे करण्यात येणारा प्रस्तावित महामार्ग हा भोम गावातून जात आहे. त्याविऊद्ध भोमवासीयांचे जे काही प्रश्न आहेत आणि मागण्या आहेत त्या नक्कीच सोडविल्या जाणार आहेत. भोमवासीयांनी आपली भेट घेऊन या अडचणीविषयी आपल्याकडे चर्चा केलेली आहे. आपण अभियंत्यांना या प्रस्तावित महामार्गाच्या कामाबाबतचा आढावा देण्यास सांगितले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी दिली. ते म्हणाले, भोमवासीय हे अनेक वर्षांपासून तेथे राहत आहेत. त्यांना कोणतीही अडचण व्हावी, नुकसान व्हावे असे सरकारलाही वाटत नाही. त्यांच्या ज्या समस्या आहेत, त्या सरकारमार्फत नक्कीच सोडविल्या जाणार आहेत. परंतु मी आताच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्रिपदाचा ताबा घेतल्यामुळे त्यावर अभ्यास होणे आवश्यक आहे. म्हणून मी त्यावर अभ्यास केल्यानंतर आणि पूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतरच निर्णय घेणार असल्याचेही मंत्री कामत यांनी सांगितले. मंत्री कामत यांची भोमवासीयांनी भेट घेऊन आपली कैफियत मांडली आहे. घरे वाचविण्याबरोबरच येथील मंदिरे तसेच दुकानेही वाचविण्यासाठी सरकार नक्कीच प्रयत्न करेल, असेही मंत्री कामत म्हणाले.