काश्मिरींना पाठिंबा देत राहू : पाक पंतप्रधान
भारतीय न्यायालयाचा निर्णय राजकारणाने प्रेरित
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
अनुच्छेद 370 वरील भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय राजकारणाने प्रेरित आहे. आम्ही काश्मीरच्या लोकांसाठी नैतिक, राजनयिक पाठिंबा सुरूच ठेवणार आहोत, असे पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकर यांनी म्हटले आहे.
काश्मीर पाकिस्तानच्या मनात स्थान राखून आहे. पाकिस्तान हा शब्दच काश्मीरशिवाय अपूर्ण आहे. पाकिस्तान आणि काश्मीरच्या लोकांमध्ये एक खास नाते आहे. राजकारण बाजूला ठेवत पूर्ण पाकिस्तान काश्मिरींना स्वत:चा निर्णय घेण्याचा अधिकार असल्याच्या मुद्द्याला समर्थन देत असल्याचे काकर यांनी पीओकेतील कथित विधानसभेच्या विशेष सत्राला संबोधित करताना म्हटले आहे.
पाकिस्तानच्या विदेश धोरणात जम्मू-काश्मीर एक महत्त्वाचा पैलू आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कायदा नव्हे तर केवळ राजकारणावर आधारित आहे. देशांतर्गत कायदे आणि न्यायालयीन निर्णयांद्वारे भारत स्वत:च्या कर्तव्यापासून मुक्ती मिळवू शकत नाही. काश्मीर हा संयुक्त राष्ट्रसंघाचा सर्वात जुना न सोडविण्यात आलेला विषय असून येथे सुरक्षा परिषदेचे प्रस्तावही लागू करण्यात आलेले नाहीत, असा दावा काकर यांनी केला आहे.
पाकिस्तान शेजारी देश म्हणून भारतासोबत चांगले संबंध इच्छित होता, परंतु 2019 मध्ये भारत सरकारने काश्मीरमध्ये घेतलेल्या एकतर्फी निर्णयामुळे आता वातावरण बिघडून गेले आहे. ही स्थिती सुधारण्याची जबाबदारी केवळ भारतावर असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.