चीनमध्ये दुर्घटनेत 35 जण ठार
वृत्तसंस्था / बीजिंग
चीनच्या झुआई शहरात एका क्रीडा केंद्रात अनेक लोक व्यायाम करत असताना त्यांच्यावर वेगाने धावणारी कार गेल्याने झालेल्या दुर्घटनेत 35 जण ठार झाले असून किमान 43 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही कार 62 वर्षांचा फान नावाचा एक चालक चालवित होता. त्याच्या पत्नीने त्याला घटस्फोट दिल्याने तो अस्वस्थ होता. त्या नैराश्याच्या भरात त्याने व्यायाम करत असलेलया लोकांवर भरधाव कार चढवून ही दुर्घटना घडविली असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती चीनच्या स्थानिक प्रशासनाने दिली ओह.
फान याचे संपूर्ण नाव प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. तथापि, त्याची चौकशी सुरु आहे. त्याने प्राथमिक तपासात स्पष्ट केलेले कारण खरे आहे काय, याची पडताळणी केली जात आहे. तसेच हा नैराश्यातून घडविण्यात आलेला अपघात आहे की घातपाताची घटना आहे, याचीही चौकशी केली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. गेल्या तीन महिन्यांमधील चीनमधीही अशी ही तिसरी घटना आहे. नैराश्याच्या भरात होणाऱ्या अशा कृत्यांची संख्या चीनमध्ये वाढत आहे, हे यावरुन स्पष्ट होते. याची कारणे शोधण्याची आवश्यकता प्रतिपादन करण्यात आली आहे.