चीनसोबत प्रतिस्पर्धा इच्छितो, संघर्ष नव्हे !
वृत्तसंस्था /वॉशिंग्टन
चालू महिन्याच्या अखेरीस इंडोनेशियाची राजधानी बाली येथे होणाऱया जी-20 शिखर परिषदेच्या व्यतिरिक्त अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन हे चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत राष्ट्रीय हित अन् ‘रेड लाइन’वर चर्चा होण्याची अपेक्षा असल्याचे बिडेन यांनी म्हटले आहे.
जिनपिंग यांना अनेकदा भेटलो आहे. चीनसोबत अमेरिकेला प्रतिस्पर्धा हवी आहे, संघर्ष करण्याची आमची इच्छा नसल्याची भूमिका जिनपिंग यांच्यासमोर मांडली आहे. आमच्या ‘रेड लाइन’ (मर्यादा) कोणत्या असाव्यात यावर चर्चा करण्याची माझी इच्छा आहे. चीनच्या राष्ट्रीय हितासाठी जिनपिंग कुठल्या गोष्टीला महत्त्वपूर्ण मानतात हे आम्ही समजून घेणार आहोत. अमेरिकेच्या हितसंबंधांबद्दल आमची भूमिका जिनपिंग यांच्यासमोर मांडणार आहोत. दोन्ही देशांचा हितसंबंधांवरून संघर्ष होऊ नये हे आम्ही सुनिश्चित करू असे बिडेन यांनी म्हटले आहे.
निष्पक्ष व्यापार आणि क्षेत्रातील अन्य देशांसोबत संबंधांसह अनेक मुद्दय़ांवर चर्चा होईल अशी अपेक्षा आहे. रशिया किंवा त्याचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचा चीन खरोखरच सन्मान करत असल्याचे मला वाटत नाही. चीन आणि रशिया परस्परांना एक विशेष आघाडीच्या स्वरुपात पाहत असल्याचेही वाटत नाही.
प्रत्यक्षात हे दोन्ही देश परस्परांपासून काही अंतर राखून आहेत. क्षी जिनपिंग हे कोणता निर्णय घेतात, हे पहावे लागणार असल्याचे बिडेन यांनी म्हटले आहे.