आम्ही सुरुवात केली, अमेरिकेने पूर्ण केले!
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर नेतान्याहूंचे उद्गार
वृत्तसंस्था/ जेरुसलेम
इराणच्या तीन प्रमुख अणुस्थळांवर हल्ला करून ते नष्ट केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. हल्ल्यानंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात संपूर्ण अपडेट दिल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेला सहकारी देश आणि ट्रम्प यांना ‘सर्वात चांगले मित्र’ असे म्हटले. हिब्रू भाषेत प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ निवेदनात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी इस्रायल डिफेन्स फोर्सेसने सुरू केलेला संघर्ष अमेरिकेने पूर्ण केलाय असेही स्पष्ट केले.
‘ऑपरेशनच्या सुरुवातीला मी तुम्हाला वचन दिले होते की इराणची अणुसुविधा कोणत्या ना कोणत्या प्रकारे नष्ट केली जाईल. हे वचन पूर्ण झाले आहे.’ अशी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या दूरध्वनी संभाषणाची माहिती इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी रविवारी दिली. ‘अमेरिकेची कारवाई संपल्यानंतर मी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले. ही चर्चा खूप महत्त्वपूर्ण आणि भावनिक होती. ट्रम्प यांनी माझे अभिनंदन केले. त्यांनी आमच्या सैन्याचे आणि आमच्या लोकांचे अभिनंदन केले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प दृढ निश्चयाने मुक्त जगाचे नेतृत्व करत आहेत. ते इस्रायलचे खूप चांगले मित्र आहेत, असा मित्र ज्याच्यासारखा दुसरा कोणी नाही.’ असे नेतात्याहू यांनी आपल्या संदेशात स्पष्ट केले.
अमेरिकेचा हल्ला ऐतिहासिक : इस्रायल राष्ट्रपती
इस्रायली राष्ट्रपती इसाक हर्झोग यांनी इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्याचे ‘ऐतिहासिक’ असे वर्णन केले आहे. ट्रम्प यांच्या विधानांवरून अमेरिका आणि इस्रायलमधील खोल आणि धाडसी संबंध दिसून येतात असे सांगतानाच हर्झोग यांनी लढाई अजून संपलेली नाही असा इशारा दिला आहे. येणारे दिवस अधिक कठीण असू शकतात, असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी इस्रायलच्या लोकांना अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.