For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आम्ही बिघडलो.....1

06:22 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
आम्ही बिघडलो     1
Advertisement

एका गुरुकुलातून वेदसंपन्न होऊन एक राजपुत्र राजवाड्यात परत आला. राजा राणीला आनंद झाला. या राजपुत्राला आता राज्य चालवायला दिलं. सगळी कामं सरदारांना वाटून दिली गेली. प्रत्येकाला नोकर चाकर, राजा बरोबरच पुरवण्यात आले. कुणालाच कुठलंच शारीरिक काम नव्हतं. नुसतं ‘ताटावरून पाटावर...’ राजपुत्राला काही केल्या झोप लागेना, सारखा विचार करत पडायचा, बिचारा दिवसेंदिवस अशक्त होऊ लागला. वैद्य आले, हकीम आले पण काही केल्या सुधारणा होईना. शेवटी एक दिवस प्रधानजी येऊन राजपुत्राला घेऊन गावाबाहेर राहायला गेले. आजूबाजूच्या शेतातून फिरू लागले. सतत कष्ट करून शांत झोपणारा शेतकरी कामगार त्यांना दिसला आणि लक्षात आलं आपण मोठं पद घेतलं, बुद्धीने काम करायला लागलो, पण बाकीच्या शरीराला कामच राहिलं नाही. सध्या आय. टी. युगात तंतोतंत हेच पाहायला मिळतं. अतिशय बुद्धिमान असणारी पिढी मोठं पद, मोठा पगार मिळवते, पण शरीराच्या किंवा इंद्रियांच्या हालचाली मात्र घालवून बसते. घरात माणसं दोनच पण कामाला बायका चार असं व्यस्त प्रमाण सर्वत्र दिसायला लागलंय. म्हणून शिक्षण घडवणारं हवं, बिघडवणारं नको. कारण शिक्षणाने बुद्धीचे दार उघडले तरी मनाची, भावनांची दारे उघडायला, सर्व शरीरावर, मनावर संस्कार करायला चांगलं शिक्षण हवं. आत्ताच्या शिक्षणातून हा कुठलाच संस्कार घडत नसल्यामुळे आम्ही बिघडलो, असंच म्हणायला लागतं. घडणं ही प्रक्रिया असते. सोन्याचा दागिना घडवायला लागतो. त्याला कलाकुसरीने घडवणारा कलाकार लागतो, कारण त्या कलाकारावर तसा संस्कार झालेला असतो. विद्यार्थी मात्र घडण्याऐवजी बिघडण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू आहे, असं वाटायला लागलंय. बीएससी अॅग्री झालेला मुलगा शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याऐवजी सरकारी नोकरीत जास्त रमतो. अशा शिक्षणाने मातीशी नाळ जोडली जाणार नसेल तर काय उपयोग? पूर्वी प्रत्येक माणूस घराच्या अवतीभवती परसबागेच्या रुपात घराला पुरेल एवढी भाजी फळं पिकवायचा पण आता अनेक कारणांमुळे शेती ही जीवन पद्धती न राहता तो एक व्यवसाय झालाय. शेतात काम न करणाऱ्यांची संख्या घटण्याचे आणखीन एक कारण म्हणजे मुलींना शेती काम करणारा मुलगा लग्नासाठी नकोच असतो. हेच कारण सगळ्या बारा बलूतेदारीचं देखील.

Advertisement

एखाद्या व्यवसायातील कलाकारी परंपरेने जपण्याऐवजी जास्त पैसा मिळवून देणारा व्यवसाय स्वीकारणारे सध्या वाढलेत. भिक्षुकी करणारी मुलंसुद्धा आजकालच्या तथाकथित मुलींना नको असतात. त्यामुळेच अशा अनेक घटकांमुळेच आमच्या समाजाची घडी बिघडायला सुरुवात झाली आहे. आपल्याला वाटतं शिक्षणाने आम्ही बरंच काही मिळवलं, पण विचार करायला लागलं तर लक्षात येतं शिक्षण अती प्रमाणात घेतलेले लोक घटस्फोटाच्या वाटेवरती आहेत. अती शिकलेले लोक घर मोडायच्या वाटेवर आहेत. अती शिकलेलेच आत्महत्येचे शिकार बनतात. अती शिकलेले लोक एकटं राहणं पसंत करतात. अती शिकलेले लोक मूल नको म्हणून स्वत:चा मोठेपणा मिरवतात. आम्ही सुद्धा शिकलेल्या मुलाला खूप शिकलेली बायको करण्याच्या मागे असतो. कारण किती पैसे घरात येतील याचाच हिशोब लावला जातो. पण अशी मुलगी घरात आल्यानंतर तिला स्वयंपाक, सणवार, नातीगोती हे नको असतातच पण आता हल्ली मुलाची जबाबदारीसुद्धा नको वाटतेय. अशा विचारात आलेली पिढी आपल्याला सुशिक्षित दिसते पण मुलाचं संगोपन करायला यांच्याजवळ वेळच नाही. अशावेळी आम्हाला नेमकेपणाने घडवणारं शिक्षण मिळालं का? हा विचार सातत्याने मनात डोकावून जातोच आणि घडण्याऐवजी आपण बिघडलोय याची टोचणी सुरू होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.