योगी आदित्यनाथांसारखे व्हावे लागणार
स्वत:च्या सरकारवर भडकले पवन कल्याण
वृत्तसंस्था/ अमरावती
आंध्रप्रदेशच्या एन. चंद्राबाबू नायडु सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले पवन कल्याण यांनी स्वत:च्या आघाडी सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कल्याण यांनी राज्याच्या गृहमंत्री अनिता यांच्यावर अक्षमतेचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी अनिता यांना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखे होण्याचा सल्ला दिला आहे. राज्यातील वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची सूचना त्यांनी केली आहे.
स्थितीत सुधारणा झाली नाही, तर ही जबाबदारी मला हातात घ्यावी लागणार असल्याचे वक्तव्यही त्यांनी केले आहे. पवन कल्याण यांनी सहकारी पक्ष तेलगू देसम पक्षाच्या नेत्या अनिता यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात महिलांच्या विरोधात गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने त्यांनी ही भूमिका मांडली आहे.
आंध्रप्रदेशात शांतता अन् सुरक्षेच्या स्थितीत उल्लेखनीय घट झाली आहे. कायदा-सुव्यवस्थेला योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशात ज्याप्रकारे सांभाळले आहे, त्याचप्रकारे आंध्रप्रदेशात सांभाळण्यात यावे. अनिता या गृहमंत्री ओत, तर मी पंचायत राज, वन तसेच पर्यावरण मंत्री आहे. अनिता यांनी स्वत:च्या कर्तव्यांचे पालन चांगल्याप्रकारे करावे, अन्यथा मला गृह विभागाची जबाबदारी सांभाळणे भाग पडेल असे उद्गार कल्याण यांनी स्वत:चा मतदारसंघ असलेल्या पीथापुरम येथील एका सभेत बोलताना काढले आहेत.
राजकीय नेता, आमदार केवळ मते मागण्यासाठी नसतो. त्याच्या काही जबाबदाऱ्या असतात. मी गृह विभागाची मागणी करू शकत नाही किंवा त्याची जबाबदारी स्वीकारू शकत नाही असा प्रकार नाही. आम्हाला योगी आदित्यनाथ यांच्यासारखे व्हावे लागणार आहे. अन्यथा गुन्हेगार बदलणार नाहीत असे पवन कल्याण म्हणाले.
कॅनडातील हिंदूंची सुरक्षा व्हावी
कॅनडात एका हिंदू मंदिर आणि हिंदूंवर झालेला हल्ला हा मनावर आघात करणारा आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यासारख्या ठिकाणी हिंदू बांधव अन् भगिनींना होणारा त्रास पाहून मोठे दु:ख होते. हिंदू एक जागतिक अल्पसंख्याक असल्यानेच कमी एकजुटता होते आणि त्यांना सहजपणे लक्ष्य केले जाते. कॅनडाचे सरकार तेथील हिंदू समुदायासाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी तत्काळ पावले उचलणार अशी आशा असल्याचे कल्याण यांनी म्हटले आहे.