आमच्यात मतभेद नाहीत : डी. के. शिवकुमार
बेंगळूर : माझ्यात आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला आहे. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या गोंधळाला तात्पुरता ‘ब्रेक’ लागला असून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतान शिवकुमार यांनी आमच्यात गटबाजी किंवा मतभेद नाहीत, असे स्पष्टीकरण दिले आहे. रविवारी बेंगळूरच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी पत्रकारांशी ते बोलत होते. आम्ही सर्वजण एकत्र काम करत आहे. राज्यातील जनतेला आमच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. त्यानुसार आम्हाला काम करावे लागेल. 2028 च्या विधानसभा निवडणूक हे आमचे पुढील लक्ष्य आहे, असेही त्यांनी सांगितले.
मी गटबाजी करत नाही
मी कधीही गटबाजी करत नाही. दिल्लीला जायचे असेल तर एकटाच जाईन. मी 8-10 आमदारांना सोबत घेऊन जाऊ शकलो असतो. मी मोठी गोष्ट नाही. मी प्रदेशाध्यक्षपदी असताना सर्वांना एकत्र घेऊन वाटचाल करावी लागते. सर्व 140 आमदार आमचे नेते आहेत. मी कोणाशीही भेदभाव करणार नाही. मी कुमारस्वामी यांच्याशीही सोबत असताना निष्ठेने काम केले आहे. मात्र त्यांना हे मान्य नसावे. परंतु, माझी निष्ठा ईश्वराला ठाऊक आहे. स्वत:च्या लाभासाठी त्यांना जे बोलायचे आहे ते बोलू द्या, मी कधीही पाठीत खंजीर खुपसणार नाही. मी थेट लढणार आहे, अशी टिप्पणी शिवकुमार यांनी केली.
खासदारांशी चर्चा करणार
केंद्रीय मंत्री, खासदारांची भेट वगळता पक्ष व आणि राजकीय उद्देशाने दिल्लीला जाणार का, या प्रश्नावर उत्तर देताना शिवकुमार म्हणाले, मुख्यमंत्री आणि मी चर्चा केली आहे. संसदेत राज्यातील पाणीपुरवठा योजना, मका व ऊस पिकांचा दर यावर मुद्दा मांडण्यासाठी खासदारांशी चर्चा करावी लागेल. यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी लागणार आहे. या बैठकीला सर्व पक्षातील खासदारांनी सहभागी व्हावे. ही बैठक दिल्लीला घ्यावी, असे माझे वैयक्तिक मत आहे. मुख्यमंत्री काय सांगतील तसे करेन. मी एकटा जाऊन सर्वांची बैठक घेणे योग्य नाही. या बैठकीत राज्यातील इतर मंत्र्यांनीही उपस्थित रहावे.