अमेरिकेच्यापेक्षा आपण तिप्पट श्रीमंत
दिवाळीच्या दिवसांमध्ये भारतात सोने खरेदीची ऐतिहासिक परंपरा आहे. भारतीय लोकांचे सुवर्णप्रेम हा जगात कुतूहलाचा, आश्चर्याचा आणि काही प्रमाणात असूयेचाही विषय आहे. केवळ श्रीमंतच नाही तर गरीबातला गरीब मनुष्यही गुंजभर का असेना, पण सोने खरेदीची मनीषा बाळगून असतो. अडीअडचणीला उपयोगी पडेल म्हणून सोने खरेदी केली जाते. पण कितीही अडचण आली तरी ते विकले जात नाही. त्यामुळे भारतामध्ये सोन्याचा प्रचंड साठा आहे. इतका की यासंदर्भात आपण अमेरिकेच्या तिप्पट श्रीमंत आहोत, असे आकडेवारी सांगते.
जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार भारतातील घरांमध्ये 2019 मध्ये 25 हजार टनांपेक्षा अधिक (अडीच कोटी किलोपेक्षा अधिक) सोने आहे. गेल्या तीन वर्षात या साठय़ात मोठी भरच पडली आहे. अमेरिकेच्या वित्त विभागाच्या अहवालानुसार 2021 मध्ये अमेरिकेच्या सरकारी खजिन्यात 8 हजार टन सोने होते. याचाच अर्थ असा की अमेरिकेच्या मध्यवर्ती सरकारकडे जितके सोने आहे त्याच्या तिपटीहून अधिक सोने भारतीयांच्या घरात आहे. गेल्या दहा वर्षात सोन्याच्या दरात 20 हजार रुपये प्रतिदहा ग्रॅमवरून 50 हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. भारतीयांची सोन्याची भूक वाढतेच आहे.