शांतता प्रक्रिया पुढे नेण्यास आम्ही सज्ज
संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/इटानगर
सैन्यमाघारीनंतरचा विचार करण्यास भारत सज्ज आहे. सीमेवर शांतता असावी आणि शेजारी देशांशी संबंध सौहार्दाचे असावेत, अशीच आमची इच्छा आहे, असे महत्वपूर्ण प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. दीपावलीच्या शुभदिनी लडाख येथे भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये झालेल्या कराराचा प्रथम टप्पा पूर्ण झाला, यासंबंधी त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर असताना गुरुवारी त्यांनी हे महत्त्वाचे वक्तव्य केले.
गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देश सीमेवरील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने एकमेकांशी संवाद करीत आहेत. हा संवाद राजनैतिक आणि सामरिक अशा दोन्ही प्रकारे केला जात आहे. याच संवादाचे फलित म्हणून 21 ऑक्टोबरला भारत आणि चीन यांच्यात सैन्यमाघारीचा करार करण्यात आला होता. एका आठवड्यात या कराराच्या प्रथम टप्प्याची पूर्तता करण्यात आली आहे. देपसांग आणि डेमचोक येथे संघर्षबिंदूंवर सैन्यमाघारीची प्रक्रिया पूर्ण झाली असून गस्त घालण्यालाही प्रारंभ झाला आहे. त्यामुळे सौहार्दाचे वातावरण निर्माण होण्यास मोठेच साहाय्य होणार आहे. हीच प्रक्रिया पुढे नेण्यास आम्ही तयार आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
पूर्वस्थिती निर्माण करण्यावर भर
लडाख सीमेवर 2020 च्या पूर्वीची स्थिती पुन्हा निर्माण करण्यावर दोन्ही देशांच्या चर्चेत भर देण्यात आला आहे. ही चर्चाप्रक्रिया अद्यापही होत आहे. पूर्वस्थिती निर्माण झाल्यास दोन्ही देशांमधील वाद मिटण्याच्या दृष्टीने योग्य ते वातावरण निर्माण होणार आहे. 2020 पूर्वी दोन्ही देशांच्या सेनांना गस्त घालण्याचे जे अधिकार होते, ते पुन्हा मिळण्याची तरतूद या करारात आहे. तसेच भारताच्या लडाख प्रदेशात राहणाऱ्या मेंढपाळांना त्यांच्या पशुधनाला चरण्यासाठी ‘नो मॅन्स लँड’मध्ये जी भूमी उपलब्ध होती, तीही परत मिळणार आहे. त्यामुळे हा करार महत्वाचा आहे. या करारात ज्या मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये एकमत झालेले आहे, त्यांच्यापैकी देपसांग आणि डेमचोक येथून सैन्यमाघार या मुद्द्याची पूर्तता आता झाली आहे. पुढील टप्प्यांमध्ये इतर मुद्द्यांवरही योग्य ती कार्यवाही होईल, असा विश्वास राजनाथसिंग यांनी त्यांच्या व्यक्तव्यात व्यक्त केला आहे.
आणखी काही कालावधी लागणार
लडाख सीमेवर 2020 च्या पूर्वीची स्थिती निर्माण होण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. गेली साडेचार वर्षे जो तणाव सातत्याने अस्तित्वात आहे, तो त्वरित नाहीसा होणार नाही. त्यासाठी आपण संयम आणि सावधानता या दोन्ही प्रकारे कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. दोन्ही देश यापुढेही एकमेकांच्या संपर्कात राहणार असून चर्चेच्या मार्गानेच समस्यांवर तोडगा काढण्याची भारताची भूमिका आहे, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.