‘सर्वांचे बॉस तर आम्ही आहोत’!
ट्रम्प यांच्यावर अप्रत्यक्षपणे राजनाथ यांनी साधला निशाणा : काही लोकांच्या भारताच्या विकासामुळे पोटदुखी
वृत्तसंस्था/ रायसेन
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे रविवारी मध्यप्रदेशच्या रायसेन जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील उमरिया गावात औबेदुल्लागंज येथे आयोजित कार्यक्रमात राजनाथ यांनी रेल्वेडबा निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन केले. यादरम्यान कार्यक्रमाला संबोधित करताना राजनाथ यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अप्रत्यक्ष स्वरुपात निशाणा साधला आहे. काही लोक स्वत:ला जगाचा बॉस समजतात, परंतु सर्वांचे बॉस तर आम्ही आहोत हे त्यांना माहित नसावे. काही लोकांना भारताची प्रगती रुचत नसल्याचे म्हणत राजनाथ यांनी ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे.
भारताचा वेगाने होणारा विकास काही लोकांना पचनी पडत नाही. भारत इतक्या वेगाने कसा विकास करू शकतो असा विचार ते करत आहेत. याचमुळे भारतात निर्मित, भारतीयांकडून निर्मित उत्पादने स्वत:च्या देशांमध्ये महाग व्हावीत म्हणून अनेक लोक प्रयत्न करत आहेत. परंतु भारत इतक्या वेगाने वाटचला करत आहे की जगातील कुठलीही शक्ती भारताला जागतिक महासत्ता होण्यापासून रोखू शकत नसल्याचे उद्गार राजनाथ सिंह यांनी काढले आहेत.
हीच भारताची शक्ती
2014 साली नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती, तेव्हा भारताची संरक्षण निर्यात केवळ 600 कोटी रुपयांची होती, परंतु आता आम्ही 24 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याचे संरक्षण उत्पादने अन्य देशांना पुरवत आहोत. हे नव्या भारताचे नवे संरक्षणक्षेत्र आहे. हीच भारताची शक्ती आहे, भारताची संरक्षण निर्यात सातत्याने वाढत असल्याचा दावा राजनाथ सिंह यांनी केला आहे.
आम्ही कर्म पाहून मारू
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत शांत बसेल असे शत्रूदेशाने मानले होते, तर या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा पंतप्रधान मोदींचा संकल्प होता. धर्म विचारून हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांच्या कृत्याची कल्पनाही त्यापूर्वी करण्यात आली नव्हती. आम्ही कुणाच्याही हत्येवर विश्वास ठेवत नाही, याचमुळे आम्ही धर्म विचारुन मारणार नाही, तर कर्म पाहून मारून असा निर्धार आम्ही केला होता आणि आम्ही कर्म पाहूनच सूड उगविला असल्याचे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
दहशतवाद्यांनी पहलगाम येथे लोकांना त्यांचा धर्म विचारून मारले होते. तर आम्ही कुणालाही धर्म विचारुन मारणार नाही, तर त्यांचे कर्म पाहून मारू असा निश्चय केला होता आणि तो आम्ही पूर्ण केला. रावणाने सीतामातेचे अपहरण करत त्यांना लंका येथे नेले होते, भगवान हनुमानांनी तेथे पोहोचून लंकेत हाहाकार उडविला होता. भगवान हनुमान पोहोचताच सीतामातेने तू हे काय केलेस? लंकेत इतका हाहाकार का उडविलास? इतक्या लोकांना का मारले असे प्रश्न विचारले. तेव्हा भगवान हनुमानाने अत्यंत विनम्रपणे हात जोडून हे माते, जिन मोहि मारा, तिन मैं मारे’ म्हणजेच ज्यांनी आमच्या लोकांना मारले, आम्ही त्यांनाच मारले असे उत्तर दिल्याचा उल्लेख राजनाथ यांनी यावेळी केला.
मॉडर्न प्रदेश अशी ओळख
कार्यक्रमाला संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी मध्यप्रदेशाचे कौतुक केले. राज्यातील विकास पाहून आगामी वर्षांमध्ये याला ‘मॉडर्न प्रदेश’ या नावाने ओळखले जाईल असे मी म्हणू शकतो. आज (रविवार) ज्या रेल्वे डबा निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन झाले आहे, त्याचे नाव ‘ब्रह्मा’ ठेवण्यात आले आहे. सृष्टिकर्त्याच्या नावावर या प्रकल्पाचे नाव ठेवणे खरोखरच एक अद्भूत कल्पना आहे. हा प्रकल्प स्वत:च्या नावाने प्रेरणा घेत आणि ती साकार करत उत्पादनाप्रकरणी नवी उंची गाठेल असा विश्वास असल्याचे राजनाथ यांनी वक्तव्य केले आहे.