Sangli Politics : विटेकर जनता आम्हाला कौल देईल याचा विश्वास : आ. सुहास बाबर
आमदार सुहास बाबर यांनी फुंकले नगरपालिका निवडणुकीचे रणशिंग
विटा : आमचे सत्तावीस उमेदवार तयार आहेत. नगरपालिका निवडणुकीला सामोरे जाताना विधानसभेच्या निवडणुकीत दिलेले विट्याच्या विकासाचे शब्द पूर्ण करून लोकांच्या समोर जातं आहे. त्यामुळे विटेकर जनता आम्हाला कौल देईल याचा विश्वास आहे, अशा शब्दात शिवसेना आमदार सुहास बाबर यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
आमदार सुहास बाबर यांनी विट्यातील विविध विकासकामांच्या मंजुरीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, कृष्णात गायकवाड, नंदू पाटील, अमर शितोळे, रणजीत पाटील, राजू जाधव, विनोद गुळवणी, उत्तम चोथे, वैभव म्हेत्रे उपस्थित होते.
यावेळी नगरपालिका निवडणुकीबाबत छेडले असता आमदार बाबर म्हणाले, आमचे सत्तावीस उमेदवार तयार आहेत. निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. मी विधानसभा निवडणुकीत सांगत होतो, की मला चेहरा बघितला की कळतं, की लोक मला मतदान करणार आहेत का? माझा तुम्हाला शब्द आहे, मी विधानसभेलाही सांगितले होते, ४ हजार लीड पडणार. विट्यातील लोकांचा निर्णय झालाय. आता नगराध्यक्षपदासाठी ओबीसी महिला आरक्षण पडलंय.
त्यामुळे ना बाबरांच्या कुटुंबातील सदस्य असणार आहे, ना पाटील यांच्या कुटुंबातील सदस्य नगराध्यक्ष होणार आहे. विट्यातील सर्वसामान्य घरातील एखादी महिला भगिनी उमेदवार नगराध्यक्ष होणार आहे. त्यामुळे ती संधी लोक आम्हाला देतील, याचा आत्मविश्वास आहे. आम्ही कोणाचे तरी घर राजकारणातून संपावे, किंवा कोणालातरी शह द्यायचा आहे, म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही. तर जे शब्द आम्ही विटेकर जनतेला विधानसभा निवडणुकीत दिले होते, ते शब्द आम्ही विकास कामांच्या माध्यमातून पूर्ण केले आहेत. भविष्यात या शहरासाठी काय करायचे आहे, ते काम घेऊन आम्ही लोकांच्या समोर जात आहोत. आम्हाला सर्वाना आत्मविश्वास आहे, की लोक आम्हाला साथ देतील.
विधानसभा मताधिक्य पाहून प्रस्ताव आल्यास विचार करू
विरोधकांकडून सन्मानजनक प्रस्ताव आला, तर आपण विचार करू, असे सांगत आमदार बाबर म्हणाले, विधानसभेचा आमदार कोण आहे?, विट्यात विधानसभेला शहरामध्ये कोणाला मताधिक्य आहे, याचा विचार करून प्रस्ताव आल्यास आपण विचार करू, असे आमदार सुहास बाबर म्हणाले.