आम्ही शांतता प्रस्थापित करणेही जाणतो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परखड संदेश : उडुपीत लक्ष कंठ गीता कार्यक्रमात सहभागी
प्रतिनिधी/ बेंगळूर
श्रीकृष्णाने युद्धभूमीवर गीतेचा संदेश दिला होता आणि भगवद्गीता आपल्याला शांती व सत्य प्रस्थापनेसाठी अत्याचार करणाऱ्यांचा शेवटही गरजेचा आहे असा संदेश देते. आम्ही लाल दिल्ल्याच्या तटबंदीवरून श्रीकृष्णाच्या दयेचा संदेश देतो अन् त्याच तटबंदीवरून मिशन सुदर्शन चक्राची देखील घोषणा करतो. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या कारवाईत देशाने आमचा संकल्प पाहिला आहे. आम्ही शांतता प्रस्थापित करणेही जाणतो अन् शांततेचे रक्षण करणेही जाणतो, असे परखड संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

शुक्रवारी उडुपी येथील श्रीकृष्ण मठात आयोजित लक्ष कंठ गीता कार्यक्रमात सभेला उद्देशून बोलताना पंतप्रधान मोदींनी देशवासियांना नवसंकल्पाचे आवाहन केले. हे संकल्प वर्तमान आणि भविण्यासाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. मोदींनी उल्लेख केलेल्या नवसंकल्पांपैकी पहिला संकल्प म्हणजे जल संरक्षण, पाण्याशिवाय जीवन नाही. त्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यास आपले प्राधान्य असले पाहिजे., दुसरा संकल्प म्हणजे झाडे लावणे. ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानात सहभागी होणे. तिसरा संकल्प प्रत्येकाने किमान एका गरीब व्यक्तीचे जीवन सुधारणे होय.
चौथा संकल्प म्हणजे स्वदेशीचा अवलंब करा. स्वदेशी उत्पादनांचा वापर करा म्हणजे आमचा पैसा आमच्याजवळच राहील. पाचवा संकल्प नैसर्गिक शेतीचा स्वीकार करणे होय. शेतकऱ्यांनी ‘नॅचरल फार्मिंग’वर भर द्यावा. रसायनांचा वापर करून माती खराब करण्याऐवजी नैसर्गिक शेतीवर भर द्या, असे आवाहन त्यांनी केले. सहावा संकल्प आरोग्यपूर्ण जीवनशैलीवर भर द्या. स्वयंपाकात कमी तेल वापरुया, तृणधान्यांचा वापर करूया, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
सातवा संकल्प, योग हा दैनंदिन जीवनाचा भाग बनवा. आरोग्य हीच धनसंपदा असल्याने योग करून आरोग्यवान बना. आठवा संकल्प हस्तप्रतींच्या रक्षणासाठी सहकार्य करा. नववा संकल्प म्हणजे देशातील किमान 25 तीर्थक्षेत्रांचे दर्शन करन, असा संकल्प करा. 2047 च्या अमृतकाळाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भारतीयांनी आपले कर्तव्य बजावावे. विकसिक कर्नाटक, विकसित भारताचा संकल्प आम्ही केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात, लक्ष कंठ गीता पठण कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल उडुपीच्या पर्याय पुत्तीगे मठाचे सुगुणेंद्र स्वामीजींचे अभिनंदन केले. हे सनातन संकृती अभियान आहे. यातून मला प्रेरणा मिळाली. नवीन पिढीला भगवद्गीतेशी जोडण्यासाठी हे एक उत्तम कार्य आहे. भगवद्गीतेमध्ये विश्वकल्याणाचा संदेश आहे. यातून प्रेरणा घेत ‘सब का साथ, सब का विकास’ ही योजना राबविण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
मोदी रक्षति रक्षित:...
कार्यक्रमप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भगवान श्रीकृष्ण आपल्याला महिला सुरक्षेचे आणि महिला सक्षमीकरणाचे ज्ञान देतात. या ज्ञानाने प्रेरित होऊन आमचा देश नारी शक्ती वंदन कायद्याचा ऐतिहासिक निर्णय घेत आहे, अशी घोषणा केली. या प्रसंगी सुगुणेंद्र तीर्थ स्वामीजींनी पंतप्रधानांचे गुणगाण केले. संस्कृतमध्ये सभेला संबोधित करताना स्वामीजी म्हणाले, “... असमाकं नरेन्द्र मोदी महोदय: भारत: भाग्य विधता..., “मोदी रक्षति रक्षित:” असे विधान केले. यावेळी सभेला उपस्थित असलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून त्यांच्या विधानाचे समर्थन केले.
उडुपीच्या श्रीकृष्ण मठात आयोजित लक्ष कंठ गीता कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला. मठात श्रीकृष्णाचे दर्शन घेतल्यानंतर ते लक्ष कंठ गीता कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी त्यांनी भगवद्गीतेतील 15 व्या अध्यायातील श्लोकांचे पठण केले. नंतर गीता मंदिरमध्ये सुगुणेंद्र स्वामीजी, पेजावर विश्व प्रसन्नतीर्थ स्वामीजी, सुशिंद्रतीर्थ स्वामीजी, शिरुर वेदवर्धनतीर्थ स्वामीजी आणि कुक्के सुब्रह्मण्य येथील विद्याप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांच्याशी चर्चा केली.