वायनाड आपत्तीतील मृतांची संख्या 175
एडीआरएफकडून नागरिकांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न, अद्याप 300 हून अधिक बेपत्ता
वृत्तसंस्था/ थिरुवनंतपुरम
केरळमधील वायनाड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणे आणि भूस्खलन या नैसर्गिक आपत्तींमुळे मृत झालेल्याची संख्या 175 हून अधिक झाली आहे. अद्यापही 300 हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. कोसळलेल्या दरडींखाली अनेक लोक अडकले आहेत. अतिपावसामुळे पडलेल्या घरांमध्येही नागरिक अडकले आहेत. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकारणाच्या अनेक तुकड्या कार्यरत असून त्यांनी प्रयत्नांची शर्थ चालविली आहे. मंगळवारी सकाळपासूनच दरडी कोसळण्यास प्रारंभ झाला होता. आपत्तीची तीव्रता पाहून सेनेला सज्ज राहण्याची सूचना करण्यात आली होती. मंगळवारी संध्याकाळी सेनेच्या तुकड्यांना पाचारण करण्यात आले. भारतीय सेनेने आतापर्यंत 1 हजाराहून अधिक लोकांचे प्राण वाचविले आहेत. 10 हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. 200 हून अधिक जखमींवर उपचार केले जात आहेत. केरळमधील ही सर्वात भीषण नैसर्गिक आपत्ती मानली जात आहे.
45 साहाय्यता शिबिरे स्थापन
वायनाडमध्ये 45 साहाय्यता शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत. त्यांच्यात 3 हजारांहून अधिक पाऊस पिडित लोकांची सोय करण्यात आली आहे. त्यांना अन्नपाणी आणि औषधे पुरविली जात आहेत. वायनाडच्या परिसरात असंख्य झाडे आणि घरे कोसळल्याने अपरिमित जीवित तसेच वित्तहानी झाली आहे.
चार तास हाहाकार
दरडी कोसळण्याच्या घटना आणि भूस्खलन मंगळवारी साधारणत: चार तास सुरु होते, अशी माहिती देण्यात आली. मुंडाक्काई, चुरालमाला, अट्टामाला आणि नूलपुझ्झा ही चार खेडी पूर्णत: उद्ध्वस्त झाली असून तेथे अद्यापही अनेक ग्रामवासी बेपत्ता आहेत. चलियार नदीला आलेल्या भीषण पुरात अनेक ग्रामस्थ वाहून गेले आहेत. त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता पाऊस थांबला असला तरी अधून-मधून सरी येत आहेत. त्यामुळे साहाय्यता कार्यात अडथळेही येत आहेत. सेनेला पाचारण केल्याने स्थिती काहीशी नियंत्रणात आली आहे.
हानीचे माहिती संकलन
पाऊस कमी झाल्याने आणि दरडी कोसळण्याच्या घटना थांबल्याने आता केरळ सरकारने आपत्तीग्रस्त भागांमध्ये हानीची माहिती संकलित करण्यास प्रारंभ केला आहे. तसेच बेपत्ता नागरिकांची सूची तयार करण्यात येत आहे. यासाठी लोकांची रेशन कार्डे आणि इतर सरकारी कागदपत्रे तपासली जात आहेत.
केरळ सरकारची बैठक
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी बुधवारी दुपारी राज्याचे मंत्री आणि ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत परिस्थितीचा आणि आपत्तीच्या परिणामांचा आढावा घेण्यात आला. तसेच साहाय्यता कार्याच्या प्रगतीसंबंधीही चर्चा करण्यात आली. राज्याचे अनेक मंत्री वायनाड येथे आहेत. त्यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सेना यांच्या तुकड्या कार्यरत आहेत.
225 सैनिकांची नियुक्ती
साहाय्यता आणि निवारण कार्यासाठी भारतीय सेनेने आपल्या 225 सैनिकांची नियुक्ती आपत्तीग्रस्त भागात केली आहे. या तुकडीने अनेकांचे प्राण वाचविल्याची माहिती देण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या अनेक तुकड्या मंगळवारपासूनच कार्यरत आहेत. राज्य आपत्ती निवारण कक्षानेही साहाय्यता कार्यात महत्वाची भूमिका केली आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
केरळच्या आरोग्यमंत्री जखमी
साहाय्यता कार्याची पाहणी करण्यासाठी वायनाड येथे गेलेल्या केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांच्या कारला अपघात झाल्याने त्या जखमी झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. त्यांच्यावर मंजेरी येथील राज्य शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत. त्यांची कार एका दुचाकीस्वारावर आदळल्याने हा अपघात बुधवारी झाला. दुचाकीस्वारही जखमी झाला असून त्याच्यावरही उपचार केले जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
साहाय्यता कार्य सुरुच, पाऊस थांबला
- एनडीआरएफ, एसडीआरएफ, भारतीय सेना यांच्याकडून निवारणकार्य
- केरळचे मुख्यमंत्री विजयन यांच्याकडून आपत्कालीन बैठकीचे आयोजन
- केंद्र सरकारचा राज्य सरकारशी सतत संपर्क, साहाय्यता सामग्रीची पूर्ती