For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मार्कंडेय नदी पात्रात आठवड्यात पाणी अडवा

10:51 AM Nov 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
मार्कंडेय नदी पात्रात आठवड्यात पाणी अडवा
Advertisement

त्वरित फळ्या न घातल्यास पाटबंधारे खात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा : पाणीसाठा कमी होत असल्याने शेतकऱ्यांना चिंता

Advertisement

वार्ताहर/उचगाव 

बेळगावच्या पश्चिम भागातून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीच्या पात्रातील सुळगा (हिं.) येथे असलेल्या बंधाऱ्याला अद्याप फळ्या घालून पाणी अडविण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. येत्या आठवड्याच्या आत जर फळ्या घातल्या नाहीत तर पाटबंधारे खात्याच्या कार्यालयावर मोर्चा आणून  जाब विचारू, असा इशारा शेतकरी वर्गातून देण्यात आला आहे. बेळगावच्या पश्चिम भागातील हजारो एकर जमिनीतील पिकांची आणि जनतेची जीवनदायीनी ठरलेल्या मार्कंडेय नदीच्या पात्रातील पाण्याचा साठा दिवसेंदिवस कमी कमी होत चालल्याने नजीकच्या काळात नदीचे पात्र कोरडे पडेल, अशी भीती शेतकरीवर्गातून वर्तवली जात आहे.

Advertisement

तरी तातडीने सुळगा(हिं.) येथे असलेल्या या बंधाऱ्याला फळ्या घालून पाणी अडवावे, अशी शेतकऱ्यांनी जोरदार मागणी केली आहे. मार्कंडेय नदीच्या पात्रातील पाणी हे या भागातील तमाम जनतेची जीवनदायीनीच  आहे. शेतकऱ्यांच्या शेतवडीतील पिकाबरोबरच, या संपूर्ण भागामध्ये पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, नदीचे पात्र भरलेले असेल तरच विहिरींना पाझर असतो. आणि विहिरीतील पाणीसाठा टिकून राहतो. मात्र नजीकच्या काळात नदीचे पात्र कोरडे पडले तर मात्र तीव्र पाण्याची समस्या भासणार असल्याचे संकेत या भागात निर्माण झाले आहेत. बेळगावच्या पश्चिम भागातून अनेक गावे आणि शेतवडीतून जाणारी मार्कंडेय नदी ही या भागाला लाभलेले एक वरदानच आहे.

नदीच्या दुतर्फा पसरलेल्या हजारो एकर जमिनीमध्ये आता बटाटे, मका, ऊस, मिरची, सूर्यफूल आणि वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला अशी अनेक पिके सध्या या नदीच्या पात्रातील पाण्यावरतीच तग धरून असतात. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून नदीच्या पात्रातील पाण्याचा साठा कमी कमी होत चालल्याने नजीकच्या काळात नदीचे पात्र कोरडे पडेल, या भीतीने शेतकरी आणि नागरिक भयभीत झाले आहेत. नदीचे पात्र कोरडे झाले तर या भागातील असंख्य शेतकऱ्यांना शेतातील पिकाला पाणी कसे द्यावे याची चिंता लागून राहिली आहे.

या नदीच्या पात्रातील पाण्यावरती आतापर्यंत अनेक पिके शेतकऱ्यांनी घेतली. मात्र आता शेतवडीतील असलेल्या या पिकांचे आता पुढे काय करायचे, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. जर नदीच्या पात्रात पाण्याचा साठा एप्रिलपर्यंत टिकून राहिला तर मिरचीसह अनेक भाजीपाला पीक मोठ्या प्रमाणात या भागात शेतकरी घेत असतो. मात्र दरवर्षी मार्च महिन्यामध्ये या नदीचे पात्र कोरडे पडते आणि शेतातील पिकांना पाणी नसल्याने पिके करपू लागतात. यासाठी मार्कंडेयच्या पाण्याचा साठा मे अखेरपर्यंत टिकून राहणे हे अतिशय गरजेचे आहे. नदीच्या पात्रात पाणी राहिले तर या भागातील प्रत्येक गावामधून असलेल्या सार्वजनिक विहिरीमधील पाण्याचा साठाही टिकून राहतो. यासाठी आतापासूनच खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ताम्रपर्णी नदीला वर्षभर पाणी

बेळगाव तालुक्या लगतच असलेल्या चंदगड तालुक्यातील अनेक भागातून जाणारी ताम्रपर्णी नदीच्या पात्रात जंगमहट्टी धरणातील पाणी सोडले जाते. यामुळे नदीचे पात्र उन्हाळा, पावसाळ्यात काठोकाठ भरून असते. परिणामी या भागात शेती आणि पिण्यासाठी कधीच पाणीटंचाई भासत नाही.

मार्कंडेय नदीमध्ये तिलारीतील पाण्याची प्रतीक्षा

हीच परिस्थिती मार्कंडेय नदीची आहे. जर तिलारी धरणातील पाणी मार्कंडेय नदीच्या पात्रात आले तर या भागातही पाण्याची समस्या कधीच भेडसावणार नाही. तसेच बेळगाव शहराला पाणीपुरवठा हिंडलगा पंपिंग स्टेशनवरून केला जातो. जर मार्कंडेय नदीच्या पात्रात पाण्याचा साठा भरपूर असेल तर बेळगाव शहरालाही पिण्याच्या पाण्याची कधीच टंचाई भासणार नाही. यासाठी अनेकवेळा या संदर्भात चर्चा करण्यात येत आहेत. मात्र तिलारीच्या धरणातील पाणी मार्कंडेय नदीच्या पात्रात सोडण्यासाठी वेगवान हालचाली कोणाकडूनही होत नाहीत. यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्चा समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. तरी शासनाने याचा तातडीने विचार करून मार्कंडेय नदीच्या पात्रातही पाणीसाठा कसा जास्त टिकून राहील यासाठी प्रयत्न करावेत, अशी जोरदार मागणी या भागातील शेतकरी नागरिकांतून करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.