हॉटेल्समधील पाण्याच्या तपासणीत हवे सातत्य
शहरवासियांची मागणी : स्वच्छतेच्या नावाखाली पाण्याची नासाडी : पथदीपांचीही दुरुस्ती, केवळ अधिवेशनाच्या तोंडावर तपासणीचा फार्स
बेळगाव : अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून शहरातील हॉटेल्समधील पिण्याच्या पाण्याची तपासणी केली जात आहे. मात्र ही तपासणी केवळ अधिवेशनापुरता मर्यादित न ठेवता मध्यंतरीच्या काळातही सातत्याने पाण्याची गुणवत्ता तपासायला हवी, अशी मागणी आता शहरवासियांतून केली जात आहे. हलगा येथील सुवर्णसौधमध्ये 9 डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्व मंत्रिमंडळ आणि अधिकारी बेळगावात वास्तव्यास असणार आहेत. विधानसौध परिसरात आमदार भवन नसल्याने मंत्री आणि आमदारांची विविध हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्था केली जाते. त्यामुळे यंदाही 80 हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत.
या पार्श्वभूमीवर हॉटेल्समधील पाण्याची गुणवत्ता तपासली जात असून ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात हॉटेल्स असून खवय्यांची संख्याही तितकीच आहे. त्यामुळे दररोज अल्पोपाहार व जेवणासाठी जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. बहुतांश जण बाटलीबंद पाण्याचा उपयोग करतात. तर काही जण हॉटेलमधीलच पाणी पिण्यास पसंती देतात. यापूर्वीदेखील पाण्याची तपासणी करण्यात आली होती की केवळ अधिवेशनाच्या तोंडावर तपासणीचा फार्स सुरू आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र ही कारवाई केवळ अधिवेशनापुरतीच मर्यादित न ठेवता सातत्याने पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी आरोग्य खाते प्रयत्नशील असले पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.
पाण्याचा अपव्यय, पथदीपांचे भाग्य उजळले
अधिवेशनानिमित्त सुवर्णसौध ते शहराकडे येणाऱ्या प्रमुख रस्त्यांची डागडुजी केली जात आहे. तसेच प्रमुख रस्त्यांवरील दुभाजकांना रंगरंगोटी करण्यासाठी महापालिकेकडून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. दुभाजकांची स्वच्छता करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी केली जात असून पाण्याचा जपून वापर करा, असे सांगणाऱ्या महापालिकेला पाणी वापराचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी टँकरद्वारे पाण्याचा मारा करून दुभाजक स्वच्छ करत आहेत. या कामी दररोज हजारो लिटर पाणी वाया घालविले जात आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील पथदीप बंद होते. मात्र ते दोन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या अखत्यारित येणारे शहर आणि परिसरातील नादुरुस्त पथदीपही दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते.