अधिवेशनानंतर बेळगावसाठी आणखी एक मंत्रिपद?
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे संकेत
बेळगाव : आमदार असिफ (राजू) सेठ यांनी मंत्रिपदाची मागणी केली असल्याचे वृत्त खरे आहे. पण जिल्ह्याला आणखी एक मंत्रिपद मिळणार की नाही, याबद्दल आपणाला माहिती नाही. अधिवेशनानंतर निश्चितपणे समजून येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. येथील काँग्रेस भवनात मंगळवार दि. 3 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या भागात अल्पसंख्याकांपैकी कोणीही मंत्री झालेले नाही. त्यामुळे आमदार सेठ यांनी मंत्रिपदाची मागणी केली आहे. मात्र, त्यांना मंत्रीपद देणे किंवा नाही हा निर्णय मुख्यमंत्री सिद्धरामय्या व प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार घेतील.
महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात 1924 मध्ये बेळगावात झालेल्या काँग्रेस अधिवेशनाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शताब्दी महोत्सव साजरा करण्यात येणार असून तयारी सुरू आहे. बेंगळूर येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन चर्चा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार येत्या दोन-तीन दिवसांत बेळगावला भेट देणार असून त्यांच्या उपस्थितीत बैठक होईल. शहरात कायदा-सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासंबंधी शहर पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांच्याशी चर्चा केली आहे. गुन्हेगारीसंबंधी घटना निदर्शनास आल्यास पोलीस आयुक्तांना कळवावे, असे आवाहन मंत्री जारकीहोळींनी जनतेला केले.
पक्षासाठी राबलेले व राबणारे अनेक कार्यकर्ते आहेत. हिवाळी अधिवेशनानंतर त्यांची महामंडळावर नेमणूक करण्यात येईल, असेही मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले. बेळगाव नगर विकास प्राधिकरण (बुडा) अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, प्रदेश काँग्रेसचे सचिव सुनील हनमण्णवर, राजा सलीम आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते. पत्रकार परिषदेपूर्वी मंत्री जारकीहोळी यांनी नागरिक व कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.