For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तब्बल सात दिवसांतून एकदा पाणीपुरवठा

01:13 PM Nov 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
तब्बल सात दिवसांतून एकदा पाणीपुरवठा
Advertisement

सदाशिवनगर परिसरात एलअॅण्डटीच्या मनमानी कारभाराबाबत नाराजी 

Advertisement

बेळगाव : बेळगावकरांना 24 तास पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पाणीपुरवठ्याची जबाबदारी एलअॅण्डटी कंपनीवर सोपविण्यात आली आहे. मात्र एलअॅण्डटीच्या कारभाराबाबत नागरिक त्रस्त बनले आहेत. मनमानी पद्धतीने पाणीपुरवठा केला जात असून नागरिकांना नोव्हेंबर महिन्यातच पाण्यासाठी वाट पहावी लागत आहे. सदाशिवनगर परिसरात तब्बल सात दिवसांतून एकदा पाणी सोडले जात आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना पर्यायी व्यवस्था करण्याची वेळ आली आहे. यापूर्वी शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी पाणीपुरवठा महामंडळाकडे होती.

मात्र कांही वर्षांपूर्वी एलअॅण्डटी कंपनीकडे पाणीपुरवठ्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप आणि हिडकल जलाशयाकडून येणाऱ्या मुख्य जलवाहिनी घालण्यात आल्या आहेत. सध्या गल्लीबोळात व घरोघरी नळजोडणी देण्यासाठी जलवाहिन्या घातल्या जात आहेत. अलिकडेच स्मार्ट सिटी योजनेतून कोट्यावधी रुपये खर्च करून केलेले काँक्रीटचे रस्ते आणि सायकल ट्रॅक ड्रील मशिनच्या माध्यमातून फोडले जात आहेत. जलवाहिनी घालण्यात आल्यानंतर व्यवस्थितरित्या चरी बुजविल्या जात नसल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

Advertisement

यापूर्वी चव्हाट गल्लीत अनेकवेळा दूषित पाणीपुरवठा करण्यात आला होता. सदाशिवनगर परिसरात यापूर्वी 4 ते 5 दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जात होता. मात्र काही दिवसांपासून तब्बल सात दिवसांतून एकदा पाणी सोडले जात आहे. पाण्यासाठी आठवडाभर वाट पाहण्याची वेळ नागरिकांवर आली असल्याने पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे. अनेकजण खासगी टँकरद्वारे पाणी मागवत आहेत. तरीदेखील या गंभीर समस्येकडे एलअॅण्डटी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत एलअॅण्डटीचे व्यवस्थापक धीरज उभयकर यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता सदाशिवनगर परिसरात चार ते पाच दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातो. सात दिवसांतून एकदा पाणी सोडले जात असल्याची कल्पना आपल्याला नाही. त्याबाबत माहिती जाणून घेतली जाईल. काहीवेळा वीजपुरवठा खंडित झाल्यास अशी समस्या उद्भवते, असे त्यांनी सांगितले.

चिदंबरनगर येथे 24 तास पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ 

24 तास पाणी योजना पूर्ण होण्यास अद्याप बराच काळ लागण्याची शक्यता आहे. केवळ काही मोजक्याच प्रभागात पाणी योजना पूर्ण झाली असून प्रायोगिक तत्त्वावर 24 तास पाणीपुरवठा केला जात आहे. नुकताच वर्ल्ड बँक टीमच्या सदस्यांनी बेळगावला भेट देऊन चिदंबरनगर येथे 24 तास पाणी योजनेला चालना दिली आहे. मात्र बहुतांश प्रभागात पाण्यासाठी नागरिकांना आठवडाभर वाट पहावी लागत आहे. तर काही ठिकाणी गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात आहे, अशा तक्रारी आहेत.

Advertisement
Tags :

.