दक्षिण भागात तीन दिवस पाणीपुरवठा ठप्प
लक्ष्मीटेक-घुमटमाळ मुख्य जलवाहिनीला गळती : एलअॅण्डटीकडून दुरुस्तीचे काम हाती
बेळगाव : लक्ष्मीटेक जलशुद्धीकरण केंद्र ते घुमटमाळ दरम्यानच्या मुख्य जलवाहिनीला एमएलआयआरसी येथील राष्ट्रीय मिलटरी स्कूल कॅम्प परिसरात गळती लागली आहे. त्यामुळे शहरातील दक्षिण भागात सोमवारपासून बुधवार दि. 26 पर्यंत तीन दिवस पाणीपुरवठा ठप्प राहणार आहे. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन एलअॅण्डटी कंपनीकडून करण्यात आले आहे.
मराठा लाईट इन्फंट्रीच्या इंजिनियर विभागाकडून परिसरात यूजी केबल घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे खोदकाम करत असताना मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. सदर जलवाहिनी लक्ष्मीटेक ते घुमटमाळकडे जाणारी आहे. सोमवारी सकाळी 450 एमएम पीएससी जलवाहिनीला गळती लागल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. ही माहिती एलअॅण्डटीच्या अधिकाऱ्यांना समजताच तातडीने अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दक्षिण विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचा पाणीपुरवठा थांबविण्यात आला. त्यामुळे पुढील दोन दिवस दक्षिण विभागाचा पाणीपुरवठा ठप्प असणार आहे. ऐन उन्हाळ्यातच पाणीपुरवठा तीन दिवस ठप्प असल्याने नागरिकांना विहिरी, कूपनलिका किंवा टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागणार आहे. दुरुस्तीच्या कामाला विलंब लागणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन एलअॅण्डटी कंपनीकडून एका पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
वडगाव, टिळकवाडी, नानावाडी, मजगाव, उद्यमबाग, राजाराम नगर, जीआयटी, चिदंबरनगर, मृत्युंजयनगर, आरसी नगर स्टेज 1, स्टेज 2, आणि परिसर, भारतनगर, शहापूर, खासबाग, जुनेबेळगाव, नाझरकॅम्प, आदर्शनगर, अनगोळ, कपिलेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर, समर्थनगर, हिंदवाडी, गोकुळनगर यासह दक्षिण भागातील विविध परिसरात तीन दिवस पाणी पुरवठा ठप्प असणार आहे. दुरुस्तीचे काम सोमवार दुपारपासून एल अँड टीकडून हाती घेण्यात आले आहे. हे काम पूर्ण होण्यास विलंब लागणार असल्याने बुधवारपर्यंत पाणीपुरवठा ठप्प होणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.