जिल्ह्यात बारा गावांना टँकरने पाणीपुरवठा
सीईओ राहुल शिंदे यांची माहिती : समस्या निवारणासाठी प्रशासन सज्ज
बेळगाव/ प्रतिनिधी
जिल्ह्यामध्ये पाण्याची समस्या निर्माण झाल्यास त्यावर उपाययोजना राबविण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. सध्या 15 गावांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. तर बारा गावांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. भविष्यात उद्भवण्राया पाणी समस्येच्या निवारणासाठी तात्काळ निर्णय घेण्याची सूचना संबंधित तालुका पंचायत अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुका पंचायत अधिकाऱ्यांना नियोजन करण्याची सूचना करण्यात आली आहे. खासगी कूपनलिका-विहिरींचे पाणी घेऊन पाणीपुरवठा करण्यासाठी सूचित करण्यात आले आहे. याबरोबरच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी निविदा मागविण्यात आली आहे. ही प्रक्रिया सुरू असून निविदा मंजूर झाली नसली तरी पाणी समस्या निर्माण झालेल्या ठिकाणी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. पाण्याची समस्या निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
नद्या कोरड्या पडल्यामुळे बहुग्राम पाणीपुरवठा योजनेवर परिणाम
बेळगाव, रामदुर्ग, अथणी या तालुक्यांमधील काही गावांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. या तालुक्यांमधील बहुग्राम पाणीपुरवठा योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यात पाण्याअभावी व्यत्यय निर्माण झाला आहे. बेळगाव तालुक्यातील हंदिगनूर बहुग्राम पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा करण्यात समस्या निर्माण झाली आहे. सदर योजना नदीच्या पाण्यावर अवलंबून असल्याने नदीचे पाणी आटले आहे. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. यावर उपाययोजना राबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच इतर तालुक्यांमध्येही हीच समस्या आहे. नद्या कोरड्या पडल्यामुळे बहुग्राम पाणीपुरवठा योजनेवर परिणाम झाला आहे. असे असले तरी खासगी कूपनलिका व विहिरींच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. सध्या दहा ते पंधरा आठवडे पुरेल इतका जनावरांचा चारा उपलब्ध आहे. भविष्यातील समस्या लक्षात घेऊन पशुसंगोपन खात्याच्या माध्यमातून चारा पुरवठा करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे यांनी दिली.