For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा

06:55 AM Mar 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये  टँकरने पाणीपुरवठा
Advertisement

निवडणुकीबरोबरच दुष्काळ निवारणासाठी जिल्हा प्रशासनाची कसरत

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळ परिस्थिती उद्भवल्याने अनेक तालुक्यांमध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यातच लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने जिल्हा प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. पाण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे निधी उपलब्ध असून पाण्याची कमतरता भासू देऊ नये, अशी सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. सध्या 11 तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

Advertisement

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. रणरणत्या उन्हामध्येही उमेदवारांनी निवडणूक प्रचारासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. अशामध्ये जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील गावांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. जिल्हा प्रशासनाकडून खासगी कूपनलिका व खासगी टँकर भाडेतत्त्वावर घेऊन पाणीपुरवठा केला जात आहे. तर काही भागांमध्ये चारा टंचाईदेखील निर्माण झाली आहे. त्यामुळे चिकोडी भागात चारा पुरवठा केंद्र सुरू करण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती, रामदुर्ग, अथणी, रायबाग, बैलहौंगल, मुडलगी, चिकोडी, खानापूर आदी तालुक्यांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. आवश्यक ठिकाणी खासगी कूपनलिका घेऊन पाणीपुरवठा केला जात आहे. तर काही ठिकाणी खासगी टँकर घेऊन पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाला एकीकडे निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी नियोजन करावे लागत आहे. तर दुसरीकडे दुष्काळ परिस्थितीमुळे अनेक समस्यांच्या भोवऱ्यात सापडलेल्या नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. विशेषकरून निर्माण झालेली पाणी समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला वारंवार अधिकाऱ्यांकडून अहवाल घ्यावा लागत आहे. याबरोबरच जबाबदारी दिलेल्या अधिकाऱ्यांनाही दुष्काळ निवारणासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. पाण्याच्या समस्येसंदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी तत्पर राहावे लागत आहे. पर्यायी व्यवस्था करण्यासाठी नियोजन करावे लागत आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

एलअॅण्डटी कंपनीकडून टँकरने पाणीपुरवठा

प्रतिनिधी/ बेळगाव

शहरातील काही भागांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा काही भागामध्ये 5 ते 8 दिवसांनंतर करण्यात येत आहे. त्यामुळे एलअॅण्डटी कंपनीने प्रत्येक प्रभागाला 3 ते 4 टँकर पाणीपुरवठा सुरू केला आहे. शनिवारी शहापूर येथील काही भागामध्ये रंगपंचमीनिमित्त पाणीपुरवठा केला गेला. यामुळे या परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.

यावर्षी पाण्याची समस्या भेडसावणार हे निश्चित आहे. कारण मागीलवर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प होते. हिडकल व राकसकोप जलाशयामधील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे दररोज किंवा 3 दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करणे अशक्य होणार आहे. त्यामुळे एलअॅण्डटी कंपनीने आता थेट टँकरनेच पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.

शहापूर येथील प्रभाग क्र. 27 मध्ये दररोज 3 ते 4 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. महिलावर्गाला त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. टँकर आल्यानंतर महिलादेखील अत्यंत शिस्तबद्धरीत्या पाणी भरून घेत आहेत. या प्रभागाचे नगरसेवक रवी साळुंखे हे नेहमीच त्या ठिकाणी हजर राहून जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन करीत आहेत. शहापूरबरोबरच वडगाव परिसरातही दररोज पाणीपुरवठा होत आहे. असाच नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी महिलावर्गातून केली जात आहे.

Advertisement
Tags :

.