पिरनवाडी रामदेव गल्लीत भीषण पाणीटंचाई
पाण्यासाठी नागरिकांना करावी लागते भटकंती : टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ
किणये : पाणी हा प्रत्येक मनुष्य जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे. पाण्यासाठी नागरिक बराच खटाटोप करतात. रामदेव गल्ली, पिरनवाडी येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या गल्लीत पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांना टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. गल्लीतील पाणीपुरवठा सुरळीत करण्याकडे पिरनवाडी नगरपंचायतीचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत. रामदेव गल्लीत गेल्या महिन्याभरापासून पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. नळांना चार ते पाच दिवसातून तर कधी कधी आठ दिवसांतून एकदा पाणी येते. ते पाणी अपुरेच मिळते. यामुळे हंडा घेऊन महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. तलावाजवळ असलेल्या विहिरीचे तसेच शेतवाडीजवळील धरणाचे पाणी नगरपंचायतीजवळच्या पाण्याच्या टाकीत सोडण्यात येते. ते पाणी पिरनवाडी येथील रामदेव गल्लीतील नळांना दिले जाते. मात्र हा पाणीपुरवठा सुरळीत नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
जलजीवन योजना सुरू करण्याची गरज
जलजीवन योजनेअंतर्गत रामदेव गल्लीत पाईपलाईन घालण्यात आली आहे. नळही बसविले आहेत. पण अद्याप योजना सुरू केलेली नाही. जलजीवन योजनेचे पाणी सुरू केल्यास गल्लीतील नागरिकांना दिलासा मिळेल. त्यामुळे ही जलजीवन योजना त्वरित सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
पाणी विकत घेणे परवडणारे आहे का?
आम्हाला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पिरनवाडी दर्ग्याजवळ असलेल्या कूपनलिकेचे पाणी आणावे लागत आहे. तसेच टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. सर्वसामान्यांना टँकरने पाणी विकत घेणे परवडणारे आहे का? पाण्यासाठी पैसे मोजावे लागले तर प्रपंचाचा गाडा चालणार कसा याची चिंता आम्हाला सतावत आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याची समस्या जाणून घेऊन सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आहे.
- कल्पना कटबुगोळ