नागावात फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाई! नागरिक देत आहेत भीषण संकटाला तोंड
पुलाची शिरोली
पुणे- बंगलूर राष्ट्रीय महामार्गालागतच्या नागाव येथील नागाव फाटा, आंबेडकर नगर, संभाजीनगर (हनुमान मंदिर), इंदिरा वसाहत या भागात वर्षभर एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. मागील हंगामात पाऊस कमी झाल्याने सध्या तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
सध्या नागावच्या महामार्गाच्या शेजारील भागाला इरिगेशन स्कीम द्वारे सिंग यांचे विहिरीमध्ये पाणी साठवले जाते.व येथून या संपूर्ण परिसराला पाणीपुरवठा केला जातो. तसेच नागाव गावभाग परिसराला गाव विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. सध्या पंचगंगेची पाणीपातळी कमी झाल्याने उपसाबंदी लागू केली आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यातच विहिरींनी तळ गाठला आहे.त्यामुळे पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. चार दिवसातून एकदा पाणी येत आहे.पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांशी नागरिकांची विशेषतः महिलांची शाब्दीक चकमकीच्या घटना घडत आहेत.या परिसरातील बहुतांशी भाग हा कामगार वर्ग आहे.सध्या महिलांना धुणी धुण्यासाठी दोन अडीच किलोमीटर लांब शिरोली एमआयडीसी किंवा शिये येथे जावे लागत आहे.पिण्याच्या पाण्यासाठी एखाद्या व्यक्तिगत मालकीच्या बोअरवेलचा आधार घ्यावा लागत आहे. किंवा खाजगी टँकर मागवून पाण्याची गरज भागवली जात आहे.त्यामुळे पाण्यासाठी नागरीकांची ससेहोलपट सुरू आहे.या सर्व बाबींचे ग्रामपंचायत प्रशासनास, लोकप्रतिनिधी ,नेतेमंडळी यांना कांहीही देणेघेणे नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त करुन नागरिक विशेषतः महिलावर्ग लोकप्रतिनिधींना अक्षरशः उपहासात्मक बोलत आहेत .
नागरीकांची किमान अपेक्षा हि आहे की ग्रामपंचायतीने टँकरने पाणीपुरवठा या भागात सुरू करावा. जेणेकरून हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची आर्थिक परवड थांबेल. पाण्याची परिस्थिती पाहता सध्या प्रस्तावित जलजीवन योजना चालू आहे. त्यामध्ये उपसा करण्याचा योग्य तो मार्ग निवडून सर्वच गटातील लोकप्रतिनिधींनी कोणतेही राजकारण न करता पाणी योजना पूर्ण करून गावाला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरू करावा. अशी मागणी सुज्ञ नागरिकांच्यातून व्यक्त होत आहे.
पाणी टंचाई दूर करण्यासाठी इरिगेशन स्किमचे पाणी गावातील तीन विहीरीत सोडण्याचे नियोजन सुरू आहे. तसेच जलजीवन पाणी योजनेबाबत गावातील सर्वच गटातील प्रमुख व्यक्तींना विश्वासात घेवून मार्ग काढला जाईल.
सौ. विमल अनिल शिंदे, लोकनियुक्त सरपंच नागाव.
पाण्यासाठी नागरीकांना त्रास होवू नये म्हणून स्वखर्चातून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु केला आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी राजकारण न करता तत्काळ योग्यती पाऊले उचलावीत.
अमित खांडेकर, विरोधी विकास आघाडी ग्रामपंचायत सदस्य.