For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अगसगे आंबेडकर गल्लीत ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई

10:23 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
अगसगे आंबेडकर गल्लीत ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई
Advertisement

वेशीतील कूपनलिकेचे पाणी आठवड्यातून एकदा : पुरवठा सुरळीत न केल्यास घागर मोर्चाचा इशारा

Advertisement

वार्ताहर/अगसगे

अगसगे ग्रामपंचायतीच्या योग्य नियोजनाअभावी गावातील आंबेडकर गल्लीतील रहिवाशांना ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावच्या वेशीतील कूपनलिकेचे पाणी आठवड्यातून एकदा सोडण्यात येते. ते पाणी तेथून आणण्याची वेळ गल्लीतील रहिवाशांवर आली आहे. खराब पाईपलाईन त्वरित दुऊस्त करून गल्लीमध्ये पिण्याचे पाणी सोडावे. अन्यथा ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. सध्या गावांमध्ये जलजीवन मिशनचे पाणी गढूळ येत असल्याने तेदेखील बंद केले आहे. त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. इतर कूपनलिकांचे पाणी गावामध्ये थोड्या प्रमाणात सोडण्यात येत आहे. मात्र आंबेडकर गल्लीमध्ये पिण्याचे पाणीच सोडण्यात येत नाही. कारण वेशीतील कूपनलिकेपासून आंबेडकर गल्लीत पाईपलाईन घातली होती. मात्र ती सध्या नादुऊस्त आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना गावच्या वेशीतील कूपनलिकेचे पाणी नेण्याची वेळ आली आहे. ग्रामपंचायतमध्ये शासनाकडून मागासवर्गीयांसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात अनुदान येते. मात्र त्या निधीचा सदुपयोग योग्यप्रकारे ग्रामपंचायत करत नसल्याचा आरोप दलित नेते संतोष मैत्री यांनी केला आहे.

Advertisement

वर्षातच पाईपलाईन नादुऊस्त

एप्रिल 2023 मध्ये ग्रामपंचायत एससीपी अनुदानातून सुमारे 60 हजार ऊपयातून वेशीतील कूपनलिकेपासून गल्लीपर्यंत पाईपलाईन घालण्यात आली होती. मात्र तेव्हापासून अद्याप एक थेंबदेखील पाणी त्या कूपनलिकेमधून गल्लीमध्ये आले नाही. घातलेली पाईपलाईन नादुऊस्त असल्याने रेंगाळत पडली आहे. या अनुदानाचा सदुपयोग झाला नाही. केवळ दिखाव्यासाठी पाईपलाईन घालण्यात आली आहे, काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

सुमारे 70 कुटुंबे पिण्याच्या पाण्याविना

आंबेडकर गल्लीमध्ये सुमारे 70 कुटुंबे आहेत. या कुटुंबीयांना भर पावसाळ्यात देखील पिण्याच्या पाण्यासाठी वारंवार ग्रामपंचायतकडे विनंती करावी लागत आहे.  आठवड्यातून एकदा वेशीतील कूपनलिकेचे पाणी सोडण्यात येते. तेथे जाऊन महिला व लहान मुलांवर पाणी आणण्याची वेळ आली आहे. ग्राम. पं. ने याची दखल घेऊन गल्लीमध्ये पिण्याचे पाणी सोडावे, अशी मागणी होऊ लागली आहे. अन्यथा ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

Advertisement
Tags :

.