For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेशोत्सव मंडळांच्या सोयीसाठी 12 ठिकाणी ‘एक खिडकी’

06:58 AM Sep 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
गणेशोत्सव मंडळांच्या सोयीसाठी  12 ठिकाणी ‘एक खिडकी’
Advertisement

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती, विसर्जन तलावांची केली पाहणी

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

गणेशोत्सव मंडळांना सुलभरित्या आणि एकाच ठिकाणी त्वरित परवाना मिळावा, यासाठी पोलीस आयुक्तांच्या व्याप्तीतील 12 पोलीस ठाण्यांमध्ये एक खिडकी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.

Advertisement

हेस्कॉम, पोलीस, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी संबंधित पोलीस ठाण्याच्या व्याप्तीमध्ये एक खिडकी केंद्रामध्ये सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत उपस्थित राहून आवश्यक परवाना देणार आहेत, असे त्यांनी सांगितले.  एक खिडकी पथकांसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नागरिकांनी वाहतुकीला अडचण ठरू नये यादृष्टीने गणेश मंडप उभारावेत, नागरिकांना रहदारीसाठी, मनपा वाहनांना कचरा नेण्यासाठी, तसेच रुग्णवाहिकांच्या रहदारीसाठी अडचण ठरू नये, यादृष्टीने मंडप उभारावेत.

गणेश आगमनाबरोबरच विसर्जनादरम्यान रस्त्यावरील विजेच्या तारा आणि विविध दूरसंपर्क केबल उंच कराव्यात. वनखात्याने धोकादायक फांद्या हटवाव्यात व सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले. हेस्कॉम, पोलीस, मनपा, वन, अग्निशमन, बीएसएनएल आणि इतर खात्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणी करून अहवाल द्यावा, अशी सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केली. मनपा अधिकाऱ्यांनी गणेश आगमन होणाऱ्या व विसर्जन होणाऱ्या मार्गावरील रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, रस्त्यावरील ख•s बुजवावेत, अंधार असलेल्या भागात पथदीपांची व्यवस्था करावी, नागरिकांसाठी प्रेक्षक गॅलरी निर्माण करण्यात यावी, अशी सूचनाही अधिकाऱ्यांना केली.

शहरामध्ये बॅनर लावण्याबाबत देण्यात येणारा परवाना याबाबतचा तपशील पोलीस अधिकाऱ्यांना द्यावा, अशी सूचना मनपा अधिकाऱ्यांना केली. पीओपी गणेशमूर्ती विक्री करू नयेत, याबाबत मनपाने जागृती करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

यावेळी पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग म्हणाले, पोलिसांनी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर समन्वयाने काम करावे. संयुक्तपणे पाहणी करून गणेशमूर्ती प्रतिष्ठापना आणि मिरवणूक ठिकाणांची पाहणी करावी, अशी सूचना केली.

यावेळी मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, डीसीपी रोहन जगदीश, एसीपी सदाशिव कट्टीमनी, प्रांताधिकारी श्रवण नायक यांच्यासह हेस्कॉम, मनपा, आरोग्य, अग्निशमन, महसूल, बीएसएनएल आदी खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

 कपिलेश्वर तलावाची पाहणी

बैठक घेतल्यानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी कपिलेश्वर तलावाला भेट देऊन गणेश विसर्जनसंदर्भात आवश्यक तयारीची पाहणी केली. अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. तलावांची स्वच्छता करून सुरक्षा व्यवस्था प्रभावीपणे उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना केली. यावेळी पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, डीसीपी रोहन जगदीश, एसीपी कट्टीमनी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.