Sangli : ऐन दिवाळीत सांगलीत पाण्याचा ठणठणाट
संतप्त भाजप आणि काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा वॉटर वर्क्सवर ठिय्या
सांगली : ऐन दिवाळीत सांगली शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. हिराबाग वॉटर वर्क्समधील पाण्याच्या टाकीला पाणीपुरवठा करणारा व्हॉल्व नादुरूस्त झाल्याने पाण्याचा शहरात ठणठणाट झाला आहे. यामुळे सांगली शहरातील भाजप आणि काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी वॉटर वर्क्ससमोर रिकामा हंडा घेवून आंदोलन केले. तसेच आयुक्तांच्या कारभाराबद्दल ताशेरेडी ओढले आहेत. आणखी दोन दिवस पाण्याची आणीबाणी सुरू राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पाणीटंचाईमुळे सांगलीकरांना मात्र ऐन दिवाळीत त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
शहरातील खणभाग, गावभाग, सिध्दार्थनगर, पत्रकारनगर, वखारभाग या परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली. महापालिकेकडून हा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. त्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान हिराबाग येथील मुख्य पाणी वाहिनीच्या दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा तात्पुरता अपुरा असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे यांनी केले आहे.
सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत मुख्य सांगली शहरात हिराबाग येथील जुन्या टाकीच्या ७०० मिमी आऊटलेट मेन लाईनवरील व्हॉल्ड अचानक नादुरुस्त झाल्याने त्याठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे खणभाग, गावभाग, वखारभाग, गणेशनगर, सिद्धार्थ परिसर तसेच हिराबाग टाकीच्या झोनमधील इतर परिसर याठिकाणी पाणीपुरवठा कमी दाबाने किंवा बंद राहणार आहे.
हा पाणी पुरवठा लवकरच पूर्ववत होणार आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. काम पूर्ण झाल्यानंतर तात्काळ रात्रीपासून नियमित पाणी पुरवठा सुरू होईल. तोपर्यंत नागरिकांनी मिळणारे पाणी काटकसरीने व जबाबदारीने वापरावे, तसेच महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे. दरम्यान महापालिकेने टँकरद्वारे पर्यायी व्यवस्था सुरू केली आहे.
दरम्यान, महापालिकेकडून ज्या भागात अपुरा पाणीपुरवठा सुरू ठेवला आहे. त्या प्रभागातील माजी नगरसेवकांनी मात्र दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पाणीपुरवठा न झाल्याने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले आहे. या आंदोलनातून त्यांनी महापालिकेच्या प्रशासनाविरूध्द चांगलेच खडे बोल सुनावले.
तसेच या नगरसेवकांनी दिवाळीच्या सणामध्ये जाणूनबुजून हा पाणीपुरवठा अपुरा ठेवण्यात आला असल्याचा आरोपही केला आहे. या प्रकाराला जे दोषी आहेत. त्यांच्यावर आयुक्त सत्यम गांधी यांनी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. रिकाम्या बादल्या आणि कळशा घेवून या नगरसेवकांनी वॉटर वर्क्ससमोर आंदोलन केले आहे. यामध्ये माजी नगसरेवक उत्तम साखळकर, मंगेश चव्हाण, मयूर पाटील यांच्यासह नगरसेवक व सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.