रेनवॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पाण्याचा पुनर्वापर
शहरात 18 ठिकाणी राबविले प्रकल्प : 1 कोटी 3 लाख लिटर पाणी पुन्हा भूगर्भात
बेळगाव : पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर करण्याच्या हेतूने ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. बेळगावमधील एक तरुण सध्या रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी मोफत मार्गदर्शन करत असून आतापर्यंत 1 लाख स्क्वेअर फुटांच्या छतांचे पाणी त्यांनी विहिरी तसेच बोअरवेलमध्ये सोडले आहे. त्यामुळे पाणी पातळीत वाढ होत असून पाण्याची भीषणता काही प्रमाणात कमी होत आहे. बेळगावच्या टिळकवाडी येथील हरिष तेरगावकर यांनी मागील दोन वर्षात तब्बल 18 ठिकाणी रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प यशस्वीरित्या राबविले आहेत. घरगुती ग्राहकांसोबत काही कंपन्यांमध्येही प्रकल्प राबवून शेकडो लिटर पाणी जमिनीत मुरविले आहे. पूर्वी रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी मोठा खर्च येत होता. परंतु संशोधनामुळे आता हा खर्च कमी झाला आहे. जवळपास उपलब्ध साहित्याचा वापर करून शुद्धीकरण केलेले पाणी विहिरी व कूपनलिकांमध्ये सोडले जाते.
1 कोटी लिटर पाण्याचा पुनर्वापर झाला
बेळगाव शहरात 18 ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्यात आल्याने 1.3 कोटी लिटर पाणी जमिनीमध्ये मुरले. त्यामुळे पाण्याचा पुनर्वापर करणे शक्य झाले. त्यामुळे रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबत नागरिकांमध्ये अधिकाधिक जागृती करण्याचा हरिष यांचा प्रयत्न आहे. भविष्यातील पाण्याची टंचाई लक्षात घेऊन प्रशासनानेही यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांचे म्हणणे आहे.
छताच्या आकारमानानुसार खर्च...
बेळगाव शहरात पाण्याचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. हे पाहून रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्याची कल्पना सूचली. कोणताही मोबदला न घेता एका सामाजिक हेतूने शहरात 18 ठिकाणी प्रकल्प राबविण्यात आले आहेत. अगदी 4 हजार रुपयांपासून ते 50 हजार रुपयांपर्यंत छताच्या आकारमानानुसार खर्च येतो. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीही रेनवॉटर हार्वेस्टिंग करून घेऊ शकते.
-हरिष तेरगावकर