गोगटे सर्कल येथे जलवाहिनीला गळती
प्रतिनिधी/ बेळगाव
शहराच्या मध्यभागी असलेल्या गोगटे सर्कल येथे जलवाहिनीला गळती लागल्यामुळे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. देसाई बिल्डींगसमोरील रस्त्यावर मागील महिन्याभरापासून गळती लागली आहे. परंतु दुरुस्तीचे काम होत नसल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना या पाण्यातूनच वाट काढत पुढे जावे लागत आहे.
शहरात पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. काही भागात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिक वैतागले आहेत. अशी एकीकडे परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र पाण्याचा अपव्यय केला जात आहे. जलवाहिनीला गळती लागली तरी दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे शेकडो लिटर पाणी वाया जात आहे.
गोगटे सर्कल येथे दररोज पाणी वाया जात असतानाही एलअॅण्डटी प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. जलवाहिनीच्या गळतीमुळे पेव्हर्स पाण्याखाली जात आहेत. काँग्रेस रोडमार्गे देसाई बिल्डींगकडे जाणाऱ्या पादचाऱ्यांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्यामुळे वेळीच दुरुस्तीचे काम करावे, अशी मागणी केली जात आहे.