गुंजीतील विहिरीचे पाणी गढूळ पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या
ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी
वार्ताहर/गुंजी
गेल्या दोन दिवसापासून येथील शेतवडीत असलेल्या एकमेव पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत शेतवडीतील पाणी शिरल्याने विहिरीचे पाणी गढूळ आणि दूषित झाले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या उद्भवली आहे. सध्या या भागामध्ये भातकापणी सुरू आहे. त्यामुळे शिवारातील पाणी काढले जात आहे. सदर पाणी थेट विहिरीत जाऊन मिसळत असल्याने विहिरीतील संपूर्ण पाणी गढूळ होऊन पिवळे झाले आहे. वास्तविक अशी समस्या वारंवार होऊन देखील याकडे गुंजी ग्रामपंचायत म्हणावे तसे लक्ष देत नसल्याने येथील नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सदर विहिरीच्या सभोवताली कायमस्वरूपी डागडुजी करणे गरजेचे आहे. मात्र प्रत्येक वेळी केवळ पंचायतीच्या कर्मचाऱ्यांना वेठीस धरून या ठिकाणी जुजबी उपाययोजना केली जात असल्याने या समस्येला येथील जनतेला वारंवार तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे अनेक वेळा नाईलाजाने सदर पाणी पिण्याची नामुष्की ओढावत असल्याचे महिला वर्गातून सांगितले जात असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तरी ग्रामपंचायतीने तातडीने उपायोजना करून विहिरीचे पाणी शुद्ध करावे तसेच कायमस्वरूपी डागडुजी करून समस्या निवारण करावे अशी आग्रही मागणी होत आहे.