राजाराम बंधाऱ्यावर पाणी, रस्ता वाहतुकीस बंद
कोल्हापूर :
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे यंदा मे महिन्यातच पंचंगंगा नदीवरील राजरामा बंधाऱ्यावर पाणी आले. त्यामुळे महापालिका प्रशासनाने येथे बॅरीकेटस् लावून बंधाऱ्यावरुन होणारी वाहतुक बंद केली. तसेच पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असुन नदीची पाणीपातळी 17 फुटांवर गेली आहे. तर राधानगरी धरणात 41.28 टक्के इतका पाणीसाठा आहे. मंगळवार 27 रोजीपर्यंत पावसाची संततधार सुरुच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मान्सुनपुर्व पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. साधारणत: 15 मे पासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. तर गेली चार दिवस सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु आहे. शुक्रवारी दुपारपर्यंतही जोरदार पाऊस सुरुच होता. दुपारनंतर मात्र पावसाने काहीशी उसंत घेतली. चार दिवस सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील उन्हाळी पिकांना फटका बसला असून काढणी खोळंबली आहे. तर खरीप हंगामाची पुर्व तयारीही ठप्प झाली आहे.
27 मे पर्यंत पावसाची शक्यता जिल्ह्यात 27 मे रोजीपर्यंत हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. उद्या 24 रोजी यलो अलर्ट असून 25 रोजी यलो अलर्ट असुन घाट भागत ऑरेंज अर्लट दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घाट भागत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
- बंधाऱ्यांचे बरगे काढले नसल्याने ओव्हरफ्लो
जिल्ह्यात पाटबंधारे कोल्हापूर उत्तर क्षेत्रात 123 आणि कोल्हापूर दक्षिण क्षेत्रात 225 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. या बंधाऱ्यांचे बरगे काढण्यात आलेले नाहीत. त्यामुळे राजाराम बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी बंधारे ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. शुक्रवार पासून काही बंधाऱ्याचे बरगे काढण्याचे काम सुरु झाले आहे.
- जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठी पुढीलप्रमाणे :
धरणाचे नाव पाणीसाठा (आकडेवारी टक्केत)
राधानगरी 41.28
तुळशी 47.61
वारणा 23.82
दूधगंगा 13.55
कासारी 27.54
कडवी 39.63
कुंभी 43.57
पाटगांव 37.28