For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरासह ग्रामीण भागात जलसंकट गडद

10:42 AM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहरासह ग्रामीण भागात जलसंकट गडद
Advertisement

शेतीसह पशुधन अडचणीत : पाझर तलाव कोरडे : कूपनलिका-विहिरींनी गाठला तळ

Advertisement

बेळगाव : उन्हाच्या झळा वाढत असल्याने दिवसेंदिवस पाणीसमस्या गंभीर बनू लागली आहे. शहरासह ग्रामीण भागात शेती आणि पशुधनाला पाण्याची टंचाई भासत आहे. विहिरी, कूपनलिका आणि तलावांनी तळ गाठल्याने पुरेशा पाण्याअभावी शेती संकटात येऊ लागली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबर पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातही शेतकऱ्यांना जलसंकटाचा सामना करावा लागत आहे. तालुक्याला वरदान ठरलेल्या मार्कंडेयच्या पाणीपातळीतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे मार्कंडेय शेजारी असलेल्या विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी तळाला गेले आहे. परिणामी शेतीबरोबर पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. त्याबरोबरच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप आणि हिडकल जलाशयांची पाणीपातळी खाली आली आहे. मार्च महिन्यातच पाण्याची सर्वत्र टंचाई निर्माण होत असल्याने पुढील दोन महिन्यात पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढू लागली आहे. काही ठिकाणी पाण्याच्या टँकरने पुरवठा होत असला तरी पाण्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून अलीकडे पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे.

एका बेळगाव तालुक्यात 1 लाख 72 हजारांहून अधिक पशुधन आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, शेळ्या-मेंढ्या आदींचा समावेश आहे. मात्र, पाझर तलाव, कूपनलिका आणि विहिरी कोरड्या पडू लागल्याने पाणीप्रश्न चिंताजनक बनू लागला आहे. यंदा पावसाच्या प्रमाणात घट झाल्याने चाराप्रश्नही गंभीर बनत आहे. त्यातच वाढत्या उन्हामुळे पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे पशुपालक दुहेरी संकटात सापडले आहेत. शिवारातील विहिरी आणि कूपनलिकांनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांना पिके जगविताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मार्च महिन्यातच उन्हाळा उच्चांकी वाढल्याने पिके सुकून जाऊ लागली आहेत. काही ठिकाणी पिके जगविण्यासाठी टँकरने पाणी सोडण्याची वेळ आली आहे. शहराबरोबर ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये पाणीसमस्या आ-वासून उभी ठाकली आहे. त्यामुळे पाणी मिळविण्यासाठी सकाळपासूनच सर्वांना वणवण फिरावे लागत आहे. मात्र, आता विहिरी आणि कूपनलिकाही तळाला गेल्याने पाणी कोठून आणावे? असा प्रश्न पडू लागला आहे. आतापासूनच टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असल्याने मोठा आर्थिक भुर्दंडही बसू लागला आहे. येत्या दोन-तीन महिन्यात वळिवाचे पाऊस न झाल्यास पाणीसमस्या गंभीर स्वरुप धारण करणार आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच पावले उचलावीत, अशी मागणीही होऊ लागली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.