नदीघाट बंधाऱ्यात लाकडे-गायीचा मृतदेह अडकल्याने पाणी दूषित
खानापूर : येथील मलप्रभा नदी घाटाजवळ असलेल्या ब्रिजकम बंधाऱ्यात लाकडे आणि कचरा मोठ्या प्रमाणात अडकला आहे. त्यातच एक गायीचा मृतदेह वाहत येऊन अडकल्याने दुर्गंधी पसरली असून नदीचे पाणी दूषित झाले आहे. नगरपंचायतीने तातडीने ही लाकडे आणि गायीचा मृतदेह बाजूला काढावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. येथील ब्रिजकम बंधाऱ्यात सध्याच्या जोरदार पावसामुळे तसेच पावसाळ्यात जांबोटी, कणकुंबी भागातून जंगलातील लाकडे नदी पात्रातून वाहून आली आहेत. ही लाकडे बंधाऱ्यातील मुशीत अडकली आहेत. त्यामुळे बंधाऱ्यात एका बाजूला कचरा साचला आहे.
यातच रविवारी एका गायीचा मृतदेह वाहत येऊन या लाकडात अडकल्याने मृतदेह कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नदीघाटावर शहरातील नागरिक फिरण्यासाठी तसेच कपडे धुण्यासाठी जातात. मात्र दुर्गंधी सुटल्याने नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रस्त्याच्या कामामुळे वाहतूक वळविण्यात आल्याने बंधाऱ्याच्या पुलावरुन वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या वाहतूकदाराना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. यासाठी नपं. व पाटबंधारे खात्याने तातडीने लाकडे व गायीचा मृतदेह हटवावा, अशी मागणी नागरिकांतून आणि प्रवासी वर्गातून होत आहे.