उद्यमबाग ब्रह्मनगर येथे मुख्य रस्त्यावर साचले पाणी
बेळगाव : खानापूर रोड, उद्यमबाग येथील एचडीएफसी बँकेच्या पाठीमागील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. याच ठिकाणी शेणखतांच्या गायरी आहेत. येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची वसती आहे. शेकडो कुटुंबीयांची घरे आहेत. त्यांना या साचलेल्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होत असून डेंग्यूचा धोका दिसतो आहे.
याठिकाणी दोन ते तीन फूट पाणी साचून राहत असल्यामुळे या परिसरात डासांचा प्रादुर्भाव होत असून महानगरपालिकेने तातडीने याची दखल घ्यावी, अशी मागणी या परिसरातील नागरिक व व्यावसायिकातून होत आहे. शहरात काही दिवसांपासून डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्वत्र डासांचे साम्राज्य आहे. त्यातच 10 ते 12 दिवसांपासून उद्यमबाग खानापूर रोडवरील एचडीएफसी बँकेच्या पाठीमागे एक एकरहून अधिक क्षेत्र मोकळे आहे. या ठिकाणी काही जणांच्या शेण खतांच्या गायरी आहेत. तेथेच मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले आहे.
दोन वर्षांपूर्वी रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात आले असले तरी पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होत नाही. पाण्याचा निचरा न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले आहे. परिणामी या परिसरात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. परिसरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. येथील स्थानिक नागरिक स्वत: पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने निचरा योग्य प्रकारे होत नाही. महानगरपालिकेने तातडीने या ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा करावा, अशी मागणी होत आहे.