बेळगुंदी-सोनोली पुलाजवळील शिवारात साचले पाणी
पुलाचे कामकाज उशिरा सुरू केल्याने पाणी शिरले शिवारात : रताळी, भातासह इतर पिकांचे नुकसान
वार्ताहर/किणये
गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बेळगुंदी-सोनोली नाल्याजवळील पुलानजीकच्या शिवारात पाणी जाऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाल्याचे बांधकाम उशिरा सुरू करण्यात आल्यामुळे बाजूच्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. शिवारात पाणी साचून पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. बेळगुंदी-सोनोली पुलाच्या बाजूला पांडुरंग वैजू निंगमुद्री यांची शेतजमीन आहे. त्यांनी या शिवारात रताळी, भात व इतर पिके घेतलेली आहेत. मात्र या नाल्यावरील पुलाचे बांधकाम उशिरा सुरू करण्यात आले. आणि पावसाला प्रारंभ झाला. त्यामुळे नाल्यातून येणाऱ्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा झाला नाही. बाजूला असलेल्या शेतकऱ्यांच्या थेट शिवारात पाणी गेले.
डोंगर भागातील पाणी नाल्यात
शिवारात 12 ते 14 दिवस पाणी साचून राहिले असल्यामुळे पीक कुजून गेले असल्याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी दिली आहे. मागील वीस दिवस तालुक्मयात मुसळधार पाऊस झाला. यामुळे नदी-नाल्यांना पूर आला होता. सध्या मंगळवारपासून पावसाने विश्र्रांती घेतली आहे. मात्र अद्यापही शेत-शिवारामध्ये पाणी साचून आहे. याचा फटका बळीराजाला बसलेला आहे. बेळगुंदी-नावगे डोंगर भागातील पाणी एका नाल्याद्वारे येते आणि हाच नाला बेळगुंदी-सोनोली रस्त्यावरून जातो. त्या ठिकाणी पूर्वी जुने पूल होते. त्या पुलाचे बांधकाम होणे गरजेचे होते. मात्र हे बांधकाम उशिरा सुरू केले आहे. त्याचा फटका वाहनधारकांसह नागरिकांना होऊ लागला आहे. 2019 साली अतिवृष्टी झाली. यावेळी या पुलावरील रस्त्यावर पाणी आले होते. त्यामुळे बेळगुंदी व सोनोली या गावांचा संपर्क तुटला होता. पुलाचे बांधकाम सुरू करण्याअगोदर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना याचा त्रास होणार नाही. याचा गांभीर्याने विचार संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी व कंत्राटदारांनी केला पाहिजे, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे
प्रशासनाने नुकसान भरपाई मिळवून द्यावी
या पुलाच्या बाजुलाच आमची एक एकर शेती आहे. यामध्ये रताळी, भात व इतर पिके घेतलेली आहेत. मात्र या ठिकाणी सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामामुळे आमच्या थेट शिवारात पाणी आले आणि पीक पाण्याखाली गेले. यामुळे आमचे यंदा सुमारे 50 हजार ऊपयांचे नुकसान झाले आहे. याला जबाबदार सदर पूल बांधणारे कंत्राटदार आहेत, असेच आम्हाला वाटते. जर पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम झाले असते, तर पाण्याचा योग्यप्रकारे निचरा झाला असता आणि पिकांचे नुकसान झाले नसते. त्यामुळे या पुलाच्या बांधकामामुळे आमच्या शिवारात पाणी साचून पिकांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून आम्हाला मदतीची अपेक्षा आहे.
- पांडुरंग निंगमुद्री, शेतकरी बेळगुंदी