रद्दीतल्या कागदाने फळफळले भाग्य
कोणाचे भाग्य कधी, कसे आणि कोणामुळे फळफळेल हे सांगता येण किती अनिश्चित असते याचा अनुभव ब्रिटनमधील मॅट विंटर नामक व्यक्तीला आला आहे. या भाग्यवान पुरुषाला त्याने त्याच्या बालपणी केवळ कुतुहल म्हणून केलेल्या कृतीचा मोठेपणी इतका लाभ झाला, की त्याच्या जीवनाची दिशाच पालटून गेली. तो 11 वर्षांचा असताना त्याने कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून एक कागद उचलला होता. त्याने आधी एका महिलेला कचरापेटीत एक बॅग टाकताना पाहिले होते.
या बॅगेत काय असेल, असे कुतुहल त्याच्याठायी निर्माण झाले आणि त्याने त्या महिलेसमोरच कचऱ्यातून ती बॅग बाहेर काढली आणि उघडली. त्या बॅकेत काही काळ्या-पांढऱ्या रंगाचे रद्दी कागद होते. हे कागद मी घरी घेऊन जाऊ का अशी विचारणा त्याने महिलेपाशी केली. तिला ते कागद टाकायचेच होते. त्यामुळे तिने सहजगत्या तशी अनुमती दिली. तो कागद घरी घेऊन गेला. कागद कसले आहेत, हे पहात असताना त्याला त्यात ‘नाईट, डेथ अँड द डेव्हिल’ या नावाचे एक एन्ग्रेव्हड् पेंEिटग मिळाले. त्याने ते स्वत:जवळ ठेवून घेतले. त्यावेळी त्याला त्याचे महत्व कळले नव्हते. केवळ कुतुहल म्हणून त्याने पेटिंग स्वत:जवळ ठेवले.
या घटनेनंतर 13 वर्षांनी, अर्थात, तो 24 वर्षांचा झाल्यानंतर त्याला या कचऱ्यातील पेंटिंगचे मूल्य कळले. ते पेंटिंग मध्ययुगातील विख्यात जर्मन चित्रकार अल्ब्रेच ड्यूरर याने इसवी सन 1513 मध्ये चितारले होते. या दुर्मिळ पेंटिंगचे मूल्य प्रचंड होते. आता त्याने या पेटिंगचा लिलाव करण्यासाठी ते ‘रेअर बुक ऑक्शन्स’ या संस्थेकडे दिले आहे. या पेंटिंगला न्यूनतम 22 लाख रुपये मिळतील अशी शक्यता आहे. प्रत्यक्ष लिलावात हे मूल्य आणखी वाढू शकते. या पेंटिंगच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असून ते अस्सल आहे, याची निश्चिती करण्यात आली आहे. आता या पेटिंगचा लिलाव 18 सप्टेंबरला केला जाणार आहे.