डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय
अमेरिकेतील सातही ‘निर्णायक’ प्रांतांमध्ये बहुमत, ‘निवडवृंद’ मतांमध्येही 300 पार, कमला हॅरिस पराभूत
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरितील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय झाला आहे. त्यांनी विजयासाठी आवश्यक 270 ‘निवडवृंद’ (कॉलेजियम) मतांची संख्या पार करुन 300 च्याही पुढचा पल्ला गाठला आहे. या निवणुकीसमवेत अमेरिकेत कनिष्ठ लोकप्रतिनिधीगृह आणि वरिष्ठ प्रतिनिधीगृह (सिनेट) मध्येही रिपब्लिकन पक्षाने घसघशीत बहुमत मिळविले आहे. त्यामुळे ट्रम्प यांना अमेरिकेचे प्रशासन चालविताना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी आणि डेमॉव्रेटिक पक्षाच्या नेत्या, तसेच अमेरिकेच्या विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचा पराभव झाला आहे. ट्रम्प यांच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या निवडणुकीची मतगणना बुधवारी रात्री उशिरापर्यंत होत होती. मात्र, दुपारी चार वाजेपर्यंतच ट्रम्प यांनी बहुमताची किमान संख्या पार केली होती. राष्ट्रीय पातळीचा विचार करता एकंदर मतदानापैकी ट्रम्प यांना साधारणत: 51 टक्के तर हॅरिस यांना 47 टक्के मते मिळाल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेतील कोणत्याही राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निर्णय ठरविणाऱ्या सात ‘निर्णायक’ प्रांतांमध्ये (स्विंग स्टेट्स्) ट्रम्प हेच विजयी ठरले आहेत. या सातपैकी किमान चार प्रांतांमध्ये विजयी होण्याची अपेक्षा बाळगणाऱ्या हॅरिस यांच्या पदरी मात्र निराशा आली आहे.
साऱ्या जगाचे लक्ष
या निवडणुकीकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिले होते. अमेरिकेचे युरोपातील मित्रदेश, इस्रायलसह मध्यपूर्वेतील देश आणि रशिया-चीनसह अमेरिकेचे प्रतिस्पर्धी देश या निवडणुकीकडे सूक्ष्मपणे लक्ष ठेवून होते. अमेरिका ही जगातील सर्वात मोठी आर्थिक आणि लोकशाहीप्रधान राज्यवव्यस्था असल्याने या देशाच्या अध्यक्षपदाची निवडणूक नेहमीच जगाच्या चर्चेचा विषय ठरते. यावेळीही या निवडणुकीला गेले दोन महिने जगभरातील वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमांमध्ये अग्रस्थान देण्यात आले होते. ही निवडणूक अतिशय चुरशीची होईल, असा प्रथम होरा होता. तथापि, प्रत्यक्षात प्रारंभापासूनच ट्रम्प यांचे पारडे बव्हंशी प्रांतांमध्ये जड असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे मतगणनाही त्वरेने झाली आणि बुधवारी रात्रीपर्यंत सर्व प्रांतांमधील निर्णयांची आकडेवारी प्रसिद्ध झाली होती.
टक्केवारीतही सरस
2016 ते 2020 या काळातही डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी डेमॉव्रेटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचा निसटता पराभव केला होता. वास्तविक राष्ट्रीय पातळीवर ट्रम्प यांना हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा काहीशी कमी मते पडली होती. पण त्यांनी विजय मिळविलेल्या प्रांतांची संख्या जास्त असल्याने तेथील सर्व ‘निवडवृंद’ किंवा कॉलेजियम मते त्यांना अधिक प्रमाणात होती. यावेळी मात्र, ट्रम्प यांनी राष्ट्रीय पातळीवरही मतदानाच्या टक्केवारीत आपल्या प्रतिस्पर्ध्याला मागे टाकले आहे. त्यामुळे हा विजय अधिक भव्य प्रमाणातील आहे.
जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय सुनिश्चित झाल्यानंतर जगभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला. जपान, चीन, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आदी देशांच्या प्रमुखांनी विशेष संदेश पाठवून त्यांचे अभिनंदन केले. जी-20 परिषदेच्या सदस्य देशांचे प्रमुख, नाटो संघटनेच्या सदस्य देशांचे प्रमुख आदींनीही ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या आहेत. चीननेही त्यांचे अभिनंदन केले आहे.
निवडणुकीतील मुख्य मुद्दे
या निवडणुकीत अमेरिकेतील लोकशाहीची जोपासना, अमेरिकेची आर्थिक स्थिती, स्थलांतरितांच्या अधिकारांचा आणि त्यांची अमेरिकेतून पाठवणी करण्याचा प्रश्न, महिलांच्या गर्भपाताच्या अधिकारचा प्रश्न, अमेरिकेतली वाढती महागाई आणि काही प्रमाणात असलेली बेरोजगारी, इस्रायल आणि हमास-हिजबुल्ला संघर्षात अमेरिकेची भूमिका काय असावी, इत्यादी मुद्दे महत्वाचे होते. मतदारांनी प्रामुख्याने लोकशाहीची जोपासना आणि आणि अमेरिकेच्या आर्थिक प्रगतीच्या मुद्द्यांवर मतदान केल्याचे अनेक सर्वेक्षणांमधून दिसून आले. गर्भपाताच्या अधिकारचा मुद्दा निर्णायक ठरेल असे अनुमान होते. तथापि, मतदारांनी या मुद्द्यापेक्षा लोकशाही, आर्थिक प्रगती आणि स्थलांतराच्या प्रश्नांना प्राधान्य दिले.
हॅरिस यांची ऐनवेळी निवड
यावेळची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक मावळते राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात रंगेल असा प्राथमिक रागरंग दिसत होता. मात्र अनेक मतदानपूर्व सर्वेक्षणांमध्ये ट्रम्प यांच्यापेक्षा बायडेन मागे पडत असल्याचे दिसून आल्यानंतर ऐनवेळी डेमॉव्रेटिक पक्षाने विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना निवडणुकीच्या मैदानात आणले. त्यामुळे बायडेन यांनी माघार घेतली. हॅरिस यांनी झंझावाती प्रचार केला. तथापि, तो अपुरा पडल्याचेही दिसून येत होते.
प्रांतनिहाय वर्चस्व
डोनाल्ड ट्रम्प : पेन्सिलव्हानिया (19 मते), व्हिस्कॉन्सिस (10 मते), मिचिगन (15 मते), टेक्सास (40 मते), फ्लोरिडा (29 मते), ओहायो (17 मते), इंडियाना (11 मते), केंटुकी (8 मते), पश्चिम व्हर्जिनिया (4 मते), टेनेसी (11 मते), उत्तर कॅरोलिना (16 मते), दक्षिण कॅरोलिना (9 मते), जॉर्जिया (16 मते), अल्बामा (9 मते), मिसिसिपी (6 मते), लुईसिआना (8 मते), ऑक्लोहोमा (7 मते), अर्कान्सास (6 मते), कान्सास (6 मते), नेब्रास्का (2 मते), उत्तर डाकोटा (3 मते), दक्षिण डाकोटा (3 मते), मिनासोटा (4 मते), व्योमिंग (3 मते), उटाह (6 मते), इदाहो (4 मते), मोंटाना (4 मते), नेवाडा (6 मते), अॅरिझोना (11 मते), अलास्का (3 मते) अशा 30 प्रांतांमध्ये विजय मिळवत 312 निवडवृंद मते डोनाल्ट ट्रंप यांनी प्राप्त केली आहेत, अशी माहिती देण्यत आली आहे.
कमला हॅरिस : कॅलिफोर्निया (54 मते), वॉशिंग्टन (12 मते), ओरेगॉन (8 मते), कोलोरॅडो (10 मते), न्यू मेक्सिको (5 मते), मिनासोटा (10 मते), इलिनॉईस (19 मते), मेईन (2 मते), न्यूयॉर्क (28 मते), व्हर्जिनिया (13 मते), वॉशिंग्टन डीसी (3 मते), व्हरमाँट (3 मते), न्यू हँपशायर (4 मते), मॅसेच्युसेट्स् (11 मते), कनेक्टिकट (7 मते), ऱ्होड बेटे (4 मते), न्यू जर्सी (14 मते), मेरीलँड (10 मते), डेल्वेअर (3 मते). हवाई (4 मते), अशा 20 प्रांतांमध्ये बहुमत मिळवत कमला हॅरिस यांनी 224 मतांची प्राप्ती केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय निश्चित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे ‘एक्स’वर संदेश पाठवून अभिनंदन केले आहे. जगात शांतता निर्माण करण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये भारतही सहभागी होऊ इच्छितो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद पुन्हा प्राप्त करण्याकरीता आपले मन:पूर्वक अभिनंदन ! अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे ‘परममित्र’ डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पुन्हा पडली सर्वेक्षणे उघडी
अमेरिकेसारख्या तुलनेने एकजिनसी असणाऱ्या देशात सहसा मतदानपूर्व सर्वेक्षणे अचूक येतात. तसेच मतदानोत्तर सर्वेक्षणे तर याहीपेक्षा अचूक येतात, अशी समजूत होती. यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये ती खरीही ठरली होती. तथापि, भारतात गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या विविध निवडणुकांमध्ये ज्याप्रमाणे मतदानपूर्व सर्वेक्षणे (प्रीपोल सर्व्हे) खोटी ठरली आहेत, त्याचप्रमाणे अमेरिकेतही या अध्यक्षीय निवडणुकीत अशी बव्हंशी सर्वेक्षणे खोटी ठरली आहेत. तसेच मतदानोत्तर सर्वेक्षणांनीही धोका दिला आहे. न्यूयॉर्क टाईम्स या जगप्रसिद्ध वृत्तपत्राने मतगणनेला प्रारंभ झाल्यानंतर काही काळातच प्रसिद्ध केलेल्या मतदानोत्तर सर्वेक्षणात कमला हॅरिस यांचे पारडे जड असल्याचे भाकित केले होते. तथापि, पेन्सिलव्हानिया या निर्णायक प्रांतात प्रारंभी मोठी आघाडी घेतल्यानंतर त्या मागे पडल्या. नंतर या महत्वाच्या राज्यात शेवटपर्यंत ट्रम्प यांनी साधारण साडेतीन टक्के मतांची आघाडी टिकवून धरत न्यूयॉर्क टाईम्सचाही होरा चुकविला आहे.
निर्णायक प्रांतात शतप्रतिशत विजय
व्हिस्कॉन्सिस, मिचिगन, पेन्सिलव्हानिया, ओहायो, नेवाडा, दक्षिण कॅरोलिना आणि जॉर्जिया हे प्रांत यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरतील. या सात प्रांतांपैकी जास्तीत जास्त प्रांत जो उमेदवार जिंकेल, त्याचा अमेरिकेचे अध्यक्षपद मिळविण्याचा मार्ग मोकळा होईल, असे अनेक तज्ञांनी मत व्यक्त केले होते. या सात प्रांतांमध्ये मिळून एकंदर 103 निवडमते आहेत. या सर्व प्रांतांमध्ये तीव्र चुरस असून कमला हॅरिस किमान तीन ते चार राज्यांमध्ये आघाडी घेतील, अशी अपेक्षा होती. तथापि, डोनाल्ड ट्रम्प यांनी हे सर्व प्रांत जिंकून सर्व 103 मते प्राप्त केली.
या निवडणुकीची काही वैशिष्ट्यो
ड प्रथम विजय, नंतर पराभव आणि नंतर पुन्हा विजय अशी मालिका साध्य करणारे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील केवळ दुसरे राष्ट्राध्यक्ष
ड सातही स्विंग प्रांतांमध्ये विजय मिळविणारे डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या 32 वर्षांमधील प्रथमच राष्ट्राध्यक्ष. 300 पार केलेले प्रथम रिपब्लिकन अध्यक्ष
ड अधिकृतरित्या घोषित केलेला आणि उमेदवारी अर्ज सादर केलेला उमेदवार बदलण्याची ही अमेरिकेच्या इतिहासातील आतापर्यंतची चौथी वेळ.