खासबाग जुन्या कचरा डेपोतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम युद्धपातळीवर
बेळगाव : खासबाग येथील जुन्या कचरा डेपोमध्ये कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी सदर काम सुरू करण्यात आले होते. मात्र, पावसामुळे अडथळा निर्माण झाल्याने मध्यंतरी काम बंद ठेवण्यात आले होते. हे काम पुन्हा एकदा हाती घेण्यात आले असून, मे 2026 पर्यंत खासबाग कचरा डेपो स्वच्छ करण्याचे उद्दिष्ट महापालिकेकडून ठेवण्यात आले आहे. यापूर्वी शहरातील कचरा खासबाग येथील कचरा डेपोमध्ये टाकण्यात येत होता. मात्र, सदर कचरा डेपोला नागरिकांनी तीव्र विरोध केल्याने तुरमुरी येथे कचरा डेपो सुरू करण्यात आला आहे. सुमारे 11 एकर जागेत खासबाग येथील जुना कचरा डेपो आहे. त्या ठिकाणी पडून असलेल्या जुन्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. प्लास्टिक कचरा सिमेंट कंपन्यांना दिला जाणार असून उर्वरित कचऱ्यापासून सेंद्रिय खत बनवून त्याची विक्री केली जाणार आहे. या कामासाठी जेसीबी व टिप्पर लावण्यात आले आहेत. पावसाळ्यामुळे बंद ठेवण्यात आलेले काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून मे 2026 पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.