जयंती नाल्यातील कचरा, प्लास्टिक थेट पंचगंगेत
कोल्हापूर :
पावसामुळे खानविलकर पेट्रोलपंप येथील जयंती नाला ओव्हरफ्लो झाला आहे. यातून रोज शेकडो टन प्लास्टिक, कचरा आणि सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात नाला ओव्हरफ्लो होऊन नदी प्रदूषित होण्याचे सत्र कायम आहे. मात्र, यावर ठोस उपाययोजनांचा अभाव दिसून येत आहे.
जिल्ह्यासाठी पंचगंगा नदी पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाची आहे. मात्र, प्लास्टिक, कचरा, आणि सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्यामुळे जलचरांचे जीवन धोक्यात आले आहे. शहरासह उपनगरातील 12 नाल्याचे सांडपाणी जयंती नाल्यात मिसळते. हा नाला पुढे पंचगंगा नदीला मिळतो. सांडपाणी प्रकल्प असला तरी ओव्हरफ्लोमुळे पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे.
प्रशासनाने यापूर्वी नदी स्वच्छतेसाठी काही मोहिमा राबवल्या. महापालिकेच्यावतीने नाल्यांवर जाळ्या बसवून गाळ काढला होता. येथील स्वच्छताही केली होती. मात्र, सातत्यपूर्ण प्रयत्नांचा अभाव आणि नागरिकांमध्ये जागरूकतेची कमतरता यामुळे ही समस्या कायम आहे. यावर उपाय म्हणून, कार्यक्षम सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, प्लास्टिकवरील कठोर बंदी, कचरा वर्गीकरण आणि नियमित स्वच्छता मोहिमा आवश्यक आहेत. स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी एकत्रितपणे काम केल्यास पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यास मदत होऊ शकते. यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज आहे.
प्लास्टिक कारवाईचा प्रश्न ऐरणीवर शहरात प्लास्टिकचा वापर वाढला आहे. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या आणि कचरा नागरिकांकडून नाल्यात टाकले जाते. एकल-वापर प्लास्टिकचा अतिवापर आणि त्याची अयोग्य विल्हेवाट ही प्रदूषणाची प्रमुख कारणे आहेत. यामुळे नदीच्या प्रदुषणाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच याचा पर्यटनावरही याचा परिणाम होत आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीवर कारवाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.