Kolhapur News : भादोले स्मशानभूमीत भानामतीचा अघोरी प्रकार उघड ; ग्रामस्थांमध्ये खळबळ
‘टॉप’ बैलांची नावे चिठ्ठीत; बैलमालकांत भीती
अंबप : भादोले येथील स्मशानभूमीत भानामतीचा अघोरी प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज स्मशानभूमीत रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम असल्याने ग्रामस्थ मोठ्या संख्येने तेथे गेले असता हा धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.या घटनेमुळे गावासह संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.स्मशानभूमीतील एका ठिकाणी लोटक्याला लाल रंगाच्या दोराने कापडात घट्ट बांधण्यात आले होते.
संशय आल्याने काही विकास अवघडे, आकाश अवघडे, उदय अवघडे, संजय अवघडे (कोतवाल) यांच्यासह ग्रामस्थांनी ते कापड उघडून पाहिले असता त्यामध्ये बाहुली,अस्थी,लिंबू, टाचण्या,हळद-कुंकू,गुलाल,काळे उडीद यासारखे साहित्य आढळून आले.याशिवाय एका चिठ्ठीमध्ये परिसरातील ‘टॉप’ बैलांची नावे तसेच त्यांच्या मालकांची नावे स्पष्टपणे लिहिलेली असल्याचे दिसून आले.या सर्व बाबींमुळे हा अघोरी प्रकार बैल शर्यतीतील वर्चस्व मिळवण्यासाठी अथवा प्रतिस्पर्ध्यांचे नुकसान करण्याच्या उद्देशाने केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी मोठ्या संख्येने स्मशानभूमीकडे धाव घेतली. चिठ्ठीतील नावे उघड झाल्याने संबंधित बैलमालकांमध्ये तीव्र चिंता व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.काही नागरिकांनी अशा अंधश्रद्धा आणि अघोरी कृत्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलिसांना कळविण्यात आले असून पुढील तपासाची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
ग्रामस्थांनी मात्र कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने तत्काळ आणि ठोस पावले उचलावीत,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.दरम्यान, भादोले परिसरात घडलेल्या या अघोरी प्रकारामुळे ग्रामीण भागात अजूनही अंधश्रद्धेचे जाळे किती खोलवर रुजले आहे, हे पुन्हा एकदा समोर आले असून समाज प्रबोधनाची गरज अधोरेखित झाली आहे.