वॉशिंग्टन सुंदर ‘इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द सिरीज’ घोषित
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-20 मालिकेत भारताच्या 2-1 विजयानंतर ‘इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द सिरीज’ हा किताब मिळाल्याने भारताच्या अष्टपैलू खेळाडूंपैकी एक या नात्याने वॉशिंग्टन सुंदरची वाढती प्रतिष्ठा अधोरेखित झाली आहे. रविवारी बीसीसीआयने पोस्ट केलेल्या ‘ड्रेसिंग रूम बीटीएस’ या पडद्यामागील व्हिडिओमध्ये टीम ऑपरेशन्स मॅनेजर राहिल खाजा हे सुंदरला हा पुरस्कार प्रदान करताना दिसले आहेत.
येथे येऊन ऑस्ट्रेलियामध्ये खेळण्याची संधी मिळणे आश्चर्यकारक आहे आणि संघाच्या विजयात योगदान देणे मला निश्चितच आनंदित करते, असे 26 वर्षीय सुंदरने सदर किताब स्वीकारल्यानंतर म्हटले. मालिकेतील सुंदरच्या कामगिरीने भारताच्या टी-20 योजनेत एक उपयुक्त खेळाडू म्हणून त्याचे मूल्य अधोरेखित केले आहे. होबार्ट येथील तिसऱ्या टी-20 मध्ये जरी सुंदरला गोलंदाज म्हणून वापरण्यात आले नाही, तरी त्याला वरच्या क्रमात बढती देण्यात आली आणि त्याने 23 चेंडूंत 49 धावा करत सामना जिंकून देणारी सर्वांत मोठी खेळी केली. त्यात त्याने चार षटकार आणि तीन चौकार हाणले आणि भारताला पाच गड्यांनी विजय मिळवून दिला आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली.
त्यानंतर चौथ्या सामन्यात शेवटच्या षटकांपर्यंत त्याने गोलंदाजी केली अणि दोन षटकांत पाच चेंडूंत तीन बळी घेत ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव आणि भारताचा 48 धावांनी विजय निश्चित केला. शनिवारी गाब्बा येथील पाचवा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाने मालिका 2-1 अशी जिंकली. सुंदरने संघाचे सीओओ खाजा यांचे योगदान देखील मान्य केले. ‘त्यांच्याकडून हा किताब मिळणे ही खूप छान भावना आहे. ते दररोज कोणत्या प्रकारची मेहनत घेतात हे आम्हाला माहिती आहे, जेणेकरून आमची अनेक कामे खूप सोपी होतात’, असे त्याने सांगितले. भावनिक झालेल्या खाजा यांनीही आपला आनंद व्यक्त केला.
सुंदरची 57 सामन्यांमधील एकूण टी-20 कामगिरी प्रभावी आहे. त्याची गोलंदाजीतील सरासरी 22 पेक्षा थोडी जास्त आहे, तर इकॉनॉमी रेट सातपेक्षा कमी आहे आणि फलंदाजीचा स्ट्राइक रेट 134 पेक्षा जास्त आहे. तो सर्व स्वरुपांत खेळू शकणारा खेळाडू असल्याने कसोटीतही टीम इंडियासाठी उपयुक्त खेळाडू आहे. त्याने 15 कसोटी सामन्यांमध्ये तीन वेळा चार आणि एकदा पाच बळींसह 35 बळी घेतले आहेत. शिवाय त्याच्या नावावर एक शतक आणि पाच अर्धशतके आहेत आणि त्याची सरासरी 44.76 आहे. ‘इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द सिरीज’ हा बीसीसीआयने द्विपक्षीय मालिकेत निर्णायक योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी सुरू केलेला नवीन किताब आहे.