त्या झोपडीत होते काय ?
कोणती वास्तू किंवा वस्तू बराच काळ न उघडलेल्या स्थितीत राहिली, की तिच्यात काय दडले आहे, यासंबंधी प्रत्येकाला उत्सुकता वाटणे साहजिक आहे. ब्रिटनमधील एका मार्गावरील एका झोपडीसंबंधात असेच औत्सुक्य अनेक दशके दाटून राहिले होते. ही झोपडी केव्हापासून बंद होती, हे कोणीही सांगू शकत नव्हते, इतका काळ ती उघडली गेली नव्हती. तिच्या दरवाजाला एक भरभक्कम कुलूप लावलेले होते आणि ते पूर्णत: गंजून गेले होते. तथापि, कोणालाही ती झोपडी उघडून पाहणे योग्य वाटत नव्हते. कारण, ती ज्याच्या मालकीची होती, तो आला आणि झोपडी आपल्या अनुमतेशिवाय कोणी उघडली, याचा शोध त्याने घेतला असता, तर उघडणाऱ्यावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता होती.
अशा वर्षानुवर्षे बंद असलेल्या वास्तूंमध्ये अनेकदा मौल्यवान वस्तू सापडू शकतात. असे अनेकदा घडलेले आहे. त्यामुळे ‘बघूया तरी काय होते ते’ असा विचार करुन दोन धाडसी व्यक्तींनी त्या झोपडीचे कुलूप काही दिवसांपूर्वी तोडले. मात्र, त्या झोपडीत त्यांना जे आढळले, ते पाहून त्यांची पाचावर धारण बसली. कारण ती केवळ झोपडी नव्हती, तर ते एक प्रेतागार होते. आतील दृष्य पाहून त्यांना प्रचंड धक्काच बसला. काही गुप्तधनाचा ठेवा हाती लागेल, म्हणून त्यांनी हे साहस केले होते. पण ते भलतेच अंगावर येणार असे दिसू लागले होते.
त्या झोपडीत दोन छोट्या खोल्या होत्या. दोन्ही खोल्यांमध्ये मृतदेहांना ठेवण्यासाठी उपयोगात आणतात ती कपाटे आणि सेल्फ होते. तिसरी आणखी एक खोली होती. ते कदाचित या प्रेतागाराचे कार्यालय असावे. कारण तेथे काही खुर्च्या आणि टेबलसदृश वस्तू होत्या. या झोपडीच्या सर्वात मोठ्या खोलीत एक मोठे शीतकपाट (फ्रीझ) होते. त्याचा उपयोग मृतदेहांना थंड ठेवून टिकवून धरण्यासाठी होत असावा. आत कोणत्याही मृतदेहाचा सांगाडा काही त्यांना सापडला नाही. पण ते एकंदरीतच दृष्य भीती निर्माण करणारे होते, एवढे निश्चित होते. या झोपडीची माहिती सोशल मिडियावर प्रसिद्ध करण्यात आल्यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. आता तेथील प्रशासनाने या झोपडीची चौकशी करण्यास प्रारंभ केला आहे.