डोनाल्ड ट्रम्प यांचा हमासला अल्टीमेटम
ओलिसांची मुक्तता 20 जानेवारीपूर्वी , अन्यथा मध्यपूर्वेत विध्वंस घडणार : हमास अन् इस्रायलदरम्यान कतारमध्ये होतेय चर्चा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे आगामी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅलेस्टाइनमधील दहशतवादी गट हमासला 20 जानेवारीपूर्वी ओलिसांची मुक्तता करण्याचा इशारा दिला आहे. जर 20 जानेवारीपूर्वी इस्रायलमधून अपहरण करण्यात आलेल्या ओलिसांची मुक्तता न केल्यास हमाससाठी ते चांगले ठरणार नाही. खरं सांगायचं तर कुणासाठीच चांगले ठरणार नाही, अशा शब्दांत ट्रम्प यांनी हमासला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
ट्रम्प यांनी यापूर्वी देखील हमासला ओलिसांची मुक्तता करण्याची सूचना केली आहे. 20 जानेवारी रोजी ट्रम्प हे अमेरिकेचे 47 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. तर दुसरीकडे कतारमध्ये ओलिसांच्या मुक्ततेवरून इस्रायल आणि हमासच्या नेतृत्वादरम्यान चर्चा सुरू आहे.
मी कुठल्याही चर्चेला नुकसान पोहोचू इच्छित नाही, परंतु माझ्या शपथविधीपूर्वी ओलिसांच्या मुक्ततेवरून करार न झाल्यास मध्यपूर्वेत विध्वंस घडेल. सर्वकाही नष्ट होऊन जाईल. मला आणखी काही सांगण्याची गरज नाही, परंतु बरेच काही घडणार असल्याचे उद्गार ट्रम्प यांनी काढले आहेत.
शपथविधीपूर्वी मुक्तता शक्य
अलिकडेच ट्रम्प यांचे विशेष प्रतिनिधी स्टीवन चार्ल्स विटकॉफ मध्यपूर्वेतून परतले आहेत. ओलिसांच्या मुक्ततेत विलंब कशामुळे झाला यावर मी बोलू इच्छित नाही. नकारात्मक होण्याचा कुठलाही अर्थ नाही. कतारमध्ये चांगल्या घडामोडी घडत आहेत. कतारची राजधानी दोहा येथे पुन्हा जाणार आहे. ओलिसांच्या मुक्ततेप्रकरणी आम्ही मोठा पल्ला गाठला असल्याचे माझे मानणे आहे. ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी आमच्याकडे काहीतरी चांगले वृत्त असेल, ज्याची घोषणा ट्रम्प करतील असे विटकॉफ यांनी सांगितले आहे.
34 ओलिसांच्या मुक्ततेस हमास तयार
हमास आणि इस्रायल यांच्यात शुक्रवारपासून ओलिसांच्या मुक्ततेवरून कतार येथे चर्चा सुरू आहे. रविवारी हमासने अदलाबदली कराराच्या पहिल्या टप्प्यात 34 ओलिसांची मुक्तता करण्याची तयारी दर्शविली आहे. यात सर्व महिला, मुले, वृद्ध आणि आजारी ओलिसांचा समावेश असेल. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने गाझापट्टीला लागून असेलल्या इस्रायलच्या अनेक भागांमध्ये हल्ला करत 254 जणांचे अपहरण केले होते. आतापर्यंत 150 हून अधिक ओलिसांची मुक्तता झाली असून अद्याप जवळपास 100 जण हमासच्या कैदेत आहेत. इस्रायलच्या सैन्याने 34 ओलीस मारले गेल्याची पुष्टी दिली आहे. हमासने अलिकडेच 19 वर्षीय इस्रायली महिला सैनिक लिरी एलबागचा व्हिडिओ जारी केला होता. लिरीचे 7 ऑक्टोबर 2023 रोजी अपहरण करण्यात आले हेते.
ओलिसांच्या कुटुंबीयांकडून फोन
ओलिसांची यापूर्वीच मुक्तता केली जायला हवी होती. 7 ऑक्टोबरचा हल्ला व्हायलाच नको होता. लोक या हल्ल्याला विसरून जातात, परंतु असे घडले होते आणि अनेक लोक यात मारले गेले होते. इस्रायल आणि अन्य ठिकाणांहून ओलिसांच्या कुटुंबीयांचे फोन मला येत आहेत. हमासच्या कैदेत असलेल्या लोकांची मुक्तता करविण्याचे आवाहन लोक मला करत आहेत. हमासने काही अमेरिकन नागरिकांनाही कैदेत ठेवले आहे. लोक माझ्याकडे रडत येतात आणि त्यांच्या मुलांचे मृतदेह परत आणू शकतो का, अशी विचारणा करतात. हमासच्या दहशतवाद्यांनी 19-20 वर्षांच्या युवतीला कारमध्ये एखाद्या बटाट्याच्या पोत्याप्रमाणे फेकले होते असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.