For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोविंद गावडे ‘देवचार’ बनून वाट दाखवत होते का ?

07:45 AM Sep 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
गोविंद गावडे ‘देवचार’ बनून  वाट दाखवत होते का
Advertisement

क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी डागली तोफ

Advertisement

प्रतिनिधी/ मडगाव

गोव्यातील आदिवासी समाजासाठी 1996 पासून आपण सामाजिक कार्य काणकोणमधून केले. हे काम करतानाच गोविंद गावडे यांच्याशी 2008 मध्ये आपली पहिली ओळख झाली. त्याआधीच लोकोत्सव, आदर्श युवा संघ, बलराम शिक्षण संस्था सुरू केल्या होत्या. 2005 साली आपण आमदारही झालो. आपल्या या वाटचालीत गोविंद गावडे ‘देवचार’ बनून मला वाट दाखवत होते का, अशा शब्दांत मंत्री रमेश तवडकर यांनी आमदार गोविंद गावडे यांचा समाचार घेतला.

Advertisement

आपण सुरू केलेल्या लोकोत्सव, आदर्श युवा संघ व बलराम शिक्षण संस्थेसंदर्भात गोविंद गावडे यांनी प्रसार माध्यमांना मुलाखत देताना जनतेची दिशाभूल करणारी विधाने केल्याने आपल्याला ही पत्रकार परिषद घ्यावी लागत असल्याचेही मंत्री रमेश तवडकर यांनी स्पष्ट केले.

मडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री रमेश तवडकर म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी आमदार गोविंद गावडे यांनी माझ्याशी संबंधित काही जुने विषय मांडले.  मळलेल्या वाटेवर रमेश तवडकर चालतात, त्यांनी स्वत:हून नवीन वाट तयार केली नाही. तसेच रमेश तवडकर यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता नसल्याची विधाने केली होती. या विधानांना मंत्री रमेश तवडकर यांनी प्रतिउत्तर दिले. आदर्श युवा संघाची स्थापना 1995 मध्ये झाली. तेव्हापासून आपले सामाजिक कार्य सुरू झाले. त्यानंतर 13 वर्षांनी गोविंद गावडे मला प्रथम फोंड्यात एका बैठकीत भेटले. त्यापूर्वी त्यांची कधी भेट झाली नाही. मग गोविंद गावडे आदर्श युवा संघासाठी कशी काय मदत करू शकतात?.

आपल्या कार्यक्षमतेवर बोलणारे गोविंद गावडे कोण ?

आपल्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता नाही, असे गोविंद गावडे म्हणतात. मात्र, आपण लोकोत्सव, आदर्श युवा संघ व बलराम शिक्षण संस्था उभी केली. श्रमधाम योजनेतून गरीब लोकांना निवारा उपलब्ध करून देण्याचे कार्य हाती घेतले. आज समस्त गोवा त्याला साक्षीदार आहे. अशावेळी आपल्या कार्यक्षमतेवर बोलणारे गोविंद गावडे कोण, असा सवालही मंत्री रमेश तवडकर यांनी उपस्थित केला.

सुदिन-दीपकचा रोष पत्करला

आपण मंत्री झाल्यावर गोविंद गावडे सातत्याने आपल्या कार्यालयात येऊन बसायचे. त्यावेळी त्यांना इतर कुणी जवळ करत नव्हते. मात्र, मित्रत्वाच्या नात्याने आपण जवळ केले व याच कारणास्तव आपल्याला सुदिन व दीपक ढवळीकर यांच्याकडून रोष पत्करावा लागला. त्याचा परिणाम आपल्या काणकोण मतदारसंघावर देखील झाला, असे मंत्री तवडकर यावेळी म्हणाले.

गोविंदने ‘ताजमहाल’ बांधला

गोविंद गावडे यांचे असेही म्हणणे आहे की, सुदिन ढवळीकर आणि सुभाष शिरोडकर यांना निवडून आणून मंत्री केले, प्रमोद सावंत यांना मुख्यमंत्री करण्यासाठी पुढाकार घेतला आणि आपल्याला आमदार व सभापती त्यांनीच केले. जेव्हा लोकशाही नव्हती तेव्हा शहाजहानने ताजमहाल बांधला होता, पण आताच्या लोकशाहीच्या राज्यात गोविंद गावडे यांनी ‘ताजमहाल’ बांधलेला आहे, अशीही टीका तवडकर यांनी केली.

गावडेंना गोमंत भूषण पुरस्कार द्यावा का ?

‘काजव्या’ला वाटते की, सगळे जग आपणच प्रकाशमान करतो, तसे गावडे यांचे झाले आहे. अपक्ष असताना त्यांना मंत्री करणाऱ्या मनोहर पर्रीकर यांचीही त्यांनी नक्कल (मिमिक्री) केलेली आहे. अशा गोव्याच्या राजकारणातील गोविंद गावडे या कलाकाराला ‘गोमंतकीय भूषण’ पुरस्कार द्यावा का, हे तपासून पाहिले पाहिजे, असे तवडकर म्हणाले.

यापुढे टीकेला उत्तर देणार नाही

गोविंद गावडे यांनी जी विधाने केली होती व सत्य परिस्थिती काय हे  लोकांना कळावे यासाठीच आपण पत्रकार परिषद घेतली. यापुढे कुणी कितीही टीका केली तरीही पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार नाही, असेही तवडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

‘पक्षाने सांगितल्यास मंत्रिपद सोडण्यासही तयार’

आगामी काळात पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे काम करण्यास कमी वेळ मिळणार असल्याने मला मंत्रिपद नको अशी आपली भूमिका होती, असे तवडकर यांनी सांगितले. “रमेश तवडकरसारखा व्यक्ती मंत्रिमंडळात हवा असे पक्षाला वाटले, त्यामुळेच मला मंत्रिपद दिले गेले. पक्षाच्या आदेशामुळे मला मंत्रिपद घ्यावे लागले. पक्षाने सांगितल्यास मी मंत्रिपद सोडण्यासही तयार आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्वत:च्या कर्मानीच सरकारातून बाहेर पडले

गोविंद गावडे यांचे प्रताप गोव्यातील जनतेने पाहिले आहे. आज ते स्वत:च्या कर्मानीच सरकारातून बाहेर पडल्याचा दावा श्री. तवडकर यांनी केला. संकुचित  विचार ठेवल्यास पक्ष वाढत नाही. पक्ष मोठा होत असताना विविध प्रकारचे लोक पक्षात येत असतात. पक्ष सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे काम करतो. गावडे पक्षात असावेत का, हे पक्ष ठरवेल, असेही तवडकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला अँथनी बार्बोझा, किशोर शेट व विनय तुबकी उपस्थित होते.

देवचार बनून कल्पना दिल्या होत्या का ?

लोकोत्सवाची संकल्पनाही आपली आणि बलराम शिक्षण संस्थाही आपण सुरू केली, असे गावडे यांनी सांगितले. पण लोकोत्सव मी 2000 साली सुरू केला. गेल्या 25 वर्षांपासून हा उत्सव सुरू आहे. मग गावडेंनी ही संकल्पना कशी दिली? तसेच बलराम शिक्षण संस्थेच्या आठ शाखा आहेत आणि ही संस्था 2007 मध्ये सुरू झाली असताना गावडेंनी ‘देवचार‘ बनून या कल्पना दिल्या होत्या का, असेही तवडकर म्हणाले.  गोविंद गावडे हे साडेआठ वर्षे मंत्री होते. या काळात त्यांना एक अंगणवाडी सुरू करता आली नाही. मग बलराम शिक्षण संस्था सुरू केल्याचे ते सांगत असल्यास, त्यांना अध्यक्ष करावे का ? अशी उपहासात्मक टीका श्री. तवडकर यांनी केली.

Advertisement
Tags :

.