महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’मध्ये ब्रिटनचा होता सहभाग?

06:04 AM Jun 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लेबर पार्टीकडून थॅचर सरकारच्या चौकशीची घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisement

ब्रिटनमध्ये 4 जुलै रोजी सार्वत्रिक निवडणूक होणार असून यादरम्यान समोर आलेल्या अनेक सर्वेक्षणांमध्ये लेबर पार्टी सत्तेवर येणार असल्याचा अनुमान काढण्यात आला आहे. सरकार स्थापन केल्यावर 1984 मध्ये भारतात झालेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टारमध्ये ब्रिटिश सरकारच्या भूमिकेची चौकशी करू अशी घोषणा लेबर पार्टीने केली आहे. ऑपरेशन ब्ल्यू स्टारला 40 वर्षे पूर्ण झाली आहेत. आमचा पक्ष शीख समुदायासोबत उभा ठाकलेला आहे. आम्ही या समुदायाच्या मागणीनुसार लेबर पार्टीचे सरकार स्थापन झाल्यावर सत्याचा शोध घेण्याचा पूर्ण प्रयत्न करू असे लेबर पार्टीच्या नेत्या एंजेला रेनॉर यांनी म्हटले आहे.

ऑपरेशन ब्ल्यू स्टारमागे ब्रिटनच्या तत्कालीन पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांची असलेली भूमिका आम्हा सर्वांपासून लपविण्यात आली असल्याचा दावा कोवेंट्री साउथ येथील लेबर पार्टीच्या उमेदवार जारा सुल्ताना यांनी केला आहे. इंदिरा गांधी यांनी सुवर्ण मंदिर परिसरात कारवाईची अनुमती दिली होती. आतापर्यंत या घटनेच्या पीडितांना न्याय मिळालेला नाही. ब्रिटिश सरकारने या घटनेत तत्कालीन पंतप्रधान राहिलेल्या मार्गारेट थॅचर यांच्य भूमिकेबद्दल चौकशी केलेली नाही असा दावा स्लाव मतदारसंघातील लेबर पार्टीचे उमेदवार तनमनजीत सिंह धेसी यांनी केला आहे. तनधनमनजीत सिंह हे ब्रिटिश संसदेत पगडी परिधान करणारे पहिले खासदार होते.

ब्रिटिश एअर सर्व्हिसकडून मदत

लेबर पार्टीच्या नेत्यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टारमध्ये थॅचर सरकारच्या भूमिकेच्या चौकशीची मागणी करण्याची ही पहिली वेळ नाही. मागील 10 वर्षांपासून लेबर पार्टीकडून ही मागणी केली जात आहे. 2014 मध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टारला 30 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एक अहवाल समोर आला होता. यात ऑपरेशन ब्ल्यू स्टारकरता ब्रिटिश स्पेशल एअर सर्व्हिसने मदत केल्याचा दावा करण्यात आला होता. ब्रिटिश एअर स्पेशल सर्व्हिस कमांडरने इंदिरा गांधी सरकारला सुवर्ण मंदिरात लपलेल्या खलिस्तानी दहशतवाद्यांना ठार करण्याचा सल्ला दिला होता. हा सल्ला जून 1984 मध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टार सुरू होण्याच्या 3 महिन्यांपूर्वी देण्यात आला होता असा दावा अहवालात आहे. इंग्लंडची एक संस्था ‘शीख फेडरेशन यूके’ने हा अहवाल तयार केला होता.

‘मर्यादित’ भूमिकेची कबुली

याच्याशी निगडित सर्व माहिती गोपनीय ठेवण्यात आली होती. तर सर्व फाइल्स क्लासिफाइड यादीत समाविष्ट करण्यात आल्या होत्या. परंतु नंतर यातील काही फाइल्स समोर आल्या होत्या. यानंतर 2014 मध्ये डेव्हिड कॅमेरून सरकारने चौकशीचा आदेश दिला होता. ऑपरेशन ब्ल्यू स्टारमध्ये ब्रिटिश सरकारची भूमिका अत्यंत ‘मर्यादित’ होती. यात ब्रिटिश सरकारची भूमिका केवळ एक ‘सल्ला’ देण्यापुरती होती असे 2014 मध्ये ब्रिटनचे तत्कालीन विदेश सचिव विलियम हेग यांनी संसदेला सांगितले होते.

ऑपरेशन ब्ल्यू स्टार

खलिस्तानी दहशतवादी जरनैल सिंह भिंद्रनवालेला पकडण्यासाठी 1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशानुसार ऑपरेशन ब्ल्यू स्टार हाती घेण्यात आले होते. भिंद्रनवाले हे अमृतसरमधील सुवर्ण मंदिर परिसरात लपून बसला होता. 6 जून 1984 रोजी सैन्याने कारवाई करत भिंद्रनवालेला ठार केले होते. या ऑपरेशनमध्ये एकूण 554 जण मारले गेले होते. यात खलिस्तानी दहशतवाद्यांचे प्रमाण अधिक होते. ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या काही दिवसांनीच इंदिरा गांधी यांची त्यांच्याच शीख अंगरक्षकांनी हत्या केली होती.

Advertisement
Next Article