तुर्कियेत नेतान्याहू यांच्या विरोधात वॉरंट
वृत्तसंस्था / अंकारा
तुर्किये या देशाने इस्रायलचे नेते बेंजामिन नेत्यान्याहू यांच्या विरोधात ‘नरसंहार’ केल्याचा आरोप ठेवत अटक वॉरंट काढले आहे. इस्रायलच्या अनेक वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधातही असे वॉरंट काढण्यात आले आहे. ही घोषणा तुर्कियेने शनिवारी केली. तुर्कियेतील शहर इस्तंबूल येथील कायदा कार्यालयाने हे वॉरंट त्या देशाच्या प्रशासकीय अनुमतीने काढले आहे, अशी माहितीही देण्यात आली आहे.
इस्रायलने हे वॉरंट हास्यास्पद असल्याचे प्रतिपादन केले आहे. या वॉरंटमध्ये नमूद करण्यात आलेले आरोप निखालस खोटे आणि आधारहीन आहेत. त्यामुळे इस्रायल हे आरोप मुळापासूनच नाकारत आहे. तुर्कियेचे हुकुमशहा एर्डोगन यांचा हा केवळ प्रसिद्धी स्टंट आहे. हे वॉरंट हा इस्रायलचा अवमान आहे, असे प्रत्युत्तर इस्रायलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री गिडॉन सार यांनी दिले. गाझा पट्टीत उद्भवलेल्या संघर्षासंबंधात तुर्कियेकडून हे वॉरंट काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली.